देवाळातील चाेरांना सातारा पाेलिसांचा प्रसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

संशयित आराेपींकडून मोटारसायकल, दानपेटीतील पैसे असा एकुण 34 हजार 139 रूपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी हस्तगत केला आहे. संबंधितांकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

सातारा : व्यसन व चैनीसाठी पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी सातारा शहरातील दुचाकी व चारचाकी वाहने, मंदिरातील दानपेटी चोरीसह एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला. याप्रकरणी मुख्य संशयितासह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. 

जुबेर शबाब शेख (वय 19, रा. शुक्रवार पेठ, सातारा), बशीर उर्फ बादशाह वली शेख (वय 20, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी दोन संशयितांची नावे आहेत. या टोळीतील मुख्य संशयितास यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्‍यता आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस उपअधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेस सूचना केल्या होत्या. त्यानुसार या शाखेच्या पथकाने संशयितांची माहिती संकलित करून गुन्हेगारांचा माग काढण्यास सुरवात केली.

बुधवारी (ता. 5) रात्री शाहू कलामंदीराजवळील इंद्रप्रस्थ अपार्टमेंटमधून चारचाकीची चोरी करून जाताना संशयितास ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी या संशयिताकडे कौशल्यपूर्ण व तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे विचारपूस करून तपास केला. त्यामध्ये त्याने दोन फेब्रुवारीला सदाशिव पेठ येथून मोटारसायकल (क्र. एमएच 11 बीएन 118) चोरून आणल्याचे सांगितले. आणखी दोन साथीदारांसह 31 जानेवारीच्या रात्री शुक्रवार पेठेतील विश्‍वविनायक मंदिरातील दानपेटी चोरून त्यातील पैसे नेल्याची कबुलीही त्याने दिली. मंगळवार पेठेतील एसबीआय बॅंकेचे एटीएम व राजवाड्यावरील राजधानी टॉवरमधील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

जरुर वाचा : काळजाला भिडतेय स्मशानातील माया

त्यानुसार मुख्य संशयितांसह पोलिसांनी जुबेर शेख, बशीर शेख यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटारसायकल, दानपेटीतील पैसे असा एकुण 34 हजार 139 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संबंधितांकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. या तपासात शाहूपूरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, पोलिस हवालदार हिंमत दबडे, हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, सचिन माने, तुषार पांढरपट्टे, राजकुमार जाधव, मनोहर वाघमळे, आशिष कुमठेकर, अजित माने, सहायक फौजदार सुनिल भोसले यांनी भाग घेतला.
हेही वाचा :  भाजपाचे उदयनराजेंना हे असेल बर्थडे गिफ्ट
 

वाचा : साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Police Arrested Two Theives In Twenty Four Hours