एकदम झक्कास : तीन वर्षीय बालक कोराेनामुक्त

एकदम झक्कास : तीन वर्षीय बालक कोराेनामुक्त

कऱ्हाड : येथील कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण सहा बाधीत रूग्ण आज (शुक्रवार) कोराेनामुक्त झाले. त्यांना घरी साेडण्यात आले आहे. त्यात 87 वर्षीय वृद्धाचा आणि तीन वर्षच्या बालकाचा समावेश आहे. दरम्यान कराड येथील एका निकट सहवासिताचा अहवाल कोरोना बाधित (कोविड-19 ) आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर  यांनी दिली आहे. 

आगाशिवनगर येथील 87 वर्षीय वृद्ध व्यक्ती, तसेच मूळ कडेगाव तालूक्यातील येतगाव येथील पण सध्या आगाशिवनागर येथे राहणारा 33 वर्षीय युवक, वनवासमाची येथील तीन वर्षीय मूल आणि 57 वर्षीय गृहस्थ, तसेच रेठरे बुद्रुक येथील 42 वर्षीय गृहस्थ आणि वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील 48 वर्षीय गृहस्थ यांना 23 एप्रिलला  कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या सर्व रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमधील विशेष कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू करण्यात आले.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन, कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वीपणे लढल्याबद्दल कोरोनामुक्त रुग्णांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी डॉ. भोसले म्हणाले, सध्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये 40 हुन जास्त कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, हे सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आमचे सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ प्रयत्न करत आहेत. यापैकी बऱ्यायशा रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. भविष्यात दुर्दैवाने रुग्णसंख्या वाढली तरी त्या रुग्णांना सामावून घेऊन, त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यास आमची यंत्रणा सक्षम आहे. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

'कृष्णा'च्या डॉक्टरांमुळेच मी झालो बरा..!

आज जवळपास 87 वर्षे झाली, मला कसला आजार नाही की कसली गोळी ! पण या कोरोनाच्या आजारामुळेच आज इतके दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. या 15 दिवसात कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व लोकांनी मला बरं करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. माझ्यासाठी त्यांनी दिलेल्या या सेवेचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कृष्णा हॉस्पिटलचा सक्षम स्टाफ असल्याने लोकांनी कोरोनाला घाबरून जाण्याची गरज नाही. पण सर्वांनी स्वतःची योग्य काळजी घ्यावी, अशा आत्मविश्वासपूर्ण शब्दांत  आगाशिवनगर येथील 87 वर्षीय कोरोनामुक्त वृद्ध गृहस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 13, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 83, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 145, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 3 असे एकूण 244 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

याबराेबरच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाता येथे 26, कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 72, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 15 व वाई येथे 21 असे एकूण 134 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या 115 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 93, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 20, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण  आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com