यंदा लग्न उरकायचं..दोन तीन लाख खर्च करायचं...या स्वप्नांचाच झाला चुराडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

वैभव मुळीक अतिशय प्रामाणिक हाेता. सर्वसामान्य कुटुंबातील जिद्दी, कष्टाळू तरुणाचा अपघाती मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. त्याच्या मित्रांचा तर घटनेवर आजही विश्वास बसेना.

दहिवडी (जि.सातारा) : यंदा लग्न उरकायचं.. दोन-तीन लाख रुपये खर्च करायचं..या आपल्या मित्रानं रंगवलेल्या स्वप्नांचा इतक्या लवकर चुराडा होईल यावर विश्वास ठेवणे वैभव मुळीकच्या श्रीकांत मदने याच्यासह इतर मित्रांना जड जात होते.

बिदाल (ता. माण) येथील वैभव मुळीक हा पाईप लाईनचे काम करत असताना जेसीबी मशीनसह विहिरीत बुडाल्याची घटना बुधवारी (२० मे) सकाळी साडेसातच्या सुमारास ढाणे वस्ती येथे घडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे बिदाल गावासह परिसरावर शोककळा पसरली. मिळेल त्या वाहनाने अथवा चालत प्रत्येकजण ढाणे वस्तीकडे धाव घेत होता. बचावकार्य सुरु असताना बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. बघ्यांच्या गर्दीला आवरताना पोलीसांची चांगलीच दमछाक होत होती. सकाळपासून मोठ्या हिकमतीने राबविलेले शोध कार्य दुपारी चार वाजता वैभवचा मृतदेह सापडल्यावर संपले. 

मात्र वैभव या जगात नाही तो आपल्याला सोडून गेलाय या घटनेवर विश्वास ठेवणे अनेकांना अवघड झाले होते. वैभवच्या संपर्कातील मित्रांना हे दु:ख पचत नव्हते. श्रीकांत मदने हा वैभवच्या अनेक मित्रांपैकी एक मित्र. अत्यंत विमनस्कावस्थेत घटनास्थळी तो भेटला होता. दु:खी मनस्थितीत तो बोलला, बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास शिवाजी मुकादम यांच्या दूध डेअरी समोर वैभवशी माझी भेट झाली होती. त्यावेळी अगोदरच तिथे उपस्थित असलेल्या मित्रांसोबत वैभवच्या गप्पा सुरु होत्या. वैभवला बघताच मी त्याला म्हणालो यंदा लाडू आहेत की नाहीत. त्यावर ताे म्हणाला की आता पंचवीस वर्षे झाली. त्यामुळे यंदा काहीही झाले तरी लग्न उरकायचंच. जवळ असलेलं दोन-तीन लाख रुपये लग्नाला खर्च करायचं आहेत. वैभव असं भरभरुन बोलल्यानंतर मी तिथून घरी गेलो.

दूसरा दिवस उजाडला आणि हाेत्याचे नव्हते झाले. वैभव जेसीबीसह विहिरीत बुडाल्याची घटना घडली. साधारण दहाच्या सुमारास मला ही दुर्दैवी घटना समजली. ही घटना समजताच या घटनेवर विश्वास ठेवणे मला कठीण जात होते. जो आपल्याशी स्वतःच्या लग्नाबद्दल बोलत होता त्याच्यासोबत असं घडलं हे ऐकून काहीच सुचत नव्हते. श्रीकांत घटनास्थळी तब्बल साधारण चार तास थांबून होता. तो सांगत होता की वैभव हा अतिशय कष्टाळू होता. तो व त्यांचा भाऊ मेहनती होते. पोलीस दलाच्या होमगार्डमध्ये काम करुन तो घरची कामे करत होता. ट्रॅक्टर चालवत होता तसेच जेसीबीवर चालक म्हणून जात होता. 

यावेळी तिथेच उपस्थित असलेले आप्पासाहेब देशमुख म्हणाले की वनखात्याच्या जागेत लावलेल्या झाडांना पाणी घालण्याचे काम वैभवकडे होते. त्याने अतिशय प्रामाणिकपणे झाडांना पाणी घातल्यानेच आज तब्बल 98 टक्के झाडे जिवंत आहेत. अशा या सर्वसामान्य कुटुंबातील जिद्दी, कष्टाळू तरुणाचा असा अपघाती मृत्यू अनेकांना चटका लावून गेला.

उशिरा का हाेईना शाळांसाठी आली दिलासादायक बातमी

काेराेना याेद्धा बनण्याकरिताची ही आहे पात्रता

बिदाल : क्षणांत हाेत्याचे नव्हते झाले

ठाकरे सरकार लक्ष देईना; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत अश्रु


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Vaibhav Mulik Friends Got Emotional After The Trageic Incident