ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डी. बी. पाटील यांचे निधन 

Senior educationist d. B. Patil passed away
Senior educationist d. B. Patil passed away

कोल्हापूर - श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ दादासाहेब तथा डी. बी. पाटील (वय 85) यांचे आज सायंकाळी निधन झाले. सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना खासगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला. त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. संस्थेच्या वडीलधारी व्यक्तीचे निधन झाल्याचे कळताच प्रिन्स शिवाजी बोर्डिंगच्या सर्व शाखांचे शिक्षक, पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना धक्का बसला. नाळे कॉलनीत त्यांचे निवासस्थान आहे. 

बहुजन समाजाची हक्काची संस्था म्हणून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संस्थेकडे पाहिले जाते. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षात श्री. पाटील यांचे निधन झाल्याने शिक्षण क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. गोटखिंडी (जि. सांगली) येथून 1964 च्या सुमारास पदवी शिक्षणासाठी कोल्हापुरात आलेल्या श्री. पाटील यांचा संबंध बोर्डिंगसह अनेक शिक्षण संस्थांशी संबंध राहिला.

मूळ ते प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचे विद्यार्थी होते. ते गेल्या पन्नास वर्षांपासून अधिक काळ माध्यमिक शिक्षणाशी संबंधित होते. 2005 पासून त्यांनी संस्थेच्या चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी 1993 ला ते महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. न्यू कॉलेज, न्यू प्राथमिक, गर्ल्स हायस्कूल, आर्किटेक्‍ट कॉलेज, पॉलिटेक्‍निक या संस्थाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान राहिले. 

संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वाटचालीतील त्यांचे मोठे योगदान राहिले. होतकरू विद्यार्थ्यांना कमी पैशात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी ते आग्रही राहिले. मुख्याध्यापक संघाची सध्याची जी इमारत उभी आहे, त्याचे श्रेयही त्यांना जाते. शैक्षणिक व्यासपीठाचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. संस्थाचालक संघटनेतही ते सक्रिय होते. महाराष्ट्र हायस्कूलच्या विविध वयोगटातील फुटबॉल संघांनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर जे यश मिळवले, त्या सर्व खेळाडूंना त्यांचे प्रोत्साहन राहिले. संस्थेचे व्यवस्थापन काटकसरीने करण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला.

शिक्षण विरोधी धोरणाविरुद्ध त्यांनी नेहमीच आवाज उठवला. किंबहुना रस्त्यावरच्या लढाईतही त्यांचा सहभाग अनेक आजारातून बरे होऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रातील आपले काम सुरूच ठेवले. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगचे कार्यालय असो अथवा मुख्याध्यापक संघ एकदा दिलेली वेळ पाळणे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते.

संस्थेच्या ज्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या, त्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. संस्थेची एक हाती सत्ता राखण्यात त्यांना यश मिळाले. त्यांचा शब्द हा संस्थेत संस्थेतही प्रमाण मानला जायचा. अनेक बुजुर्ग मंडळीबरोबर त्यांनी काम केले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा राजेंद्र व जयंत, सून, नातवंडे असा परिवार आहे. जयंत हे अमेरिकेत आहेत. 

धामधूमीतच दुःखत वार्ता 

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे. त्याच्या कार्यक्रमाचे नियोजन झाले आहे. कार्यक्रमाचे धामधूम सुरू असतानाच श्री. पाटील यांचे झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com