बिताका गडावर आढळली शिवकालीन तोफ 

अल्ताफ शेख
रविवार, 1 डिसेंबर 2019

बिताका अकोले तालुक्‍याचे शेवटचे टोक असून, तेथील गडाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. याच परिसरात जवळच पट्टा किल्ला, म्हणजेच विश्रामगड आहे. या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी वास्तव्य केल्याचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध आहेत.

अकोले : तालुक्‍यातील बिताका येथील बितनगडावर पाण्याच्या टाक्‍यामधील गाळ काढण्याचे काम सुरू असताना पुरातन ऐतिहासिक तोफेच्या आकाराची लोखंडी वस्तू आढळून आली आहे. स्थानिक तरुणांमध्ये ती शिवकालीन तोफ असल्याची चर्चा सुरू आहे. 

बिताका अकोले तालुक्‍याचे शेवटचे टोक असून, तेथील गडाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. याच परिसरात जवळच पट्टा किल्ला, म्हणजेच विश्रामगड आहे. या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी वास्तव्य केल्याचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध आहेत. या गावापासून नाशिक जिल्ह्याची हद्द सुरू होते. 

हेही वाचा मला तुरुंगात जायचे नाही 

गंजलेल्या अवस्थेतील लोखंडी तोफ

बितनगडावर पांडवकालीन अनेक टाके आहेत. त्यात पावसाळ्यात पाणी जमा होते. या वर्षी अतिवृष्टी झाल्याने पाण्याबरोबर गाळही जमा झाला असल्याने, हा गाळ काढण्याचे काम सुरू होते. शनिवारी दुपारी गडावर वन विभागाच्या सांगण्यावरून विठ्ठल पेढेकर, लालू पेढेकर, संतोष भांगरे, दशरथ साबळे, प्रकाश पेढेकर, सचिन पेढेकर, विष्णू पेढेकर हे तरुण टाक्‍यांतून गाळ काढण्याचे काम करीत असताना त्यांना गंजलेल्या अवस्थेतील एक लोखंडी तोफ आढळून आली. 

वजन 50 किलोपेक्षा अधिक

तरुणांच्या म्हणण्यानुसार, तिचे वजन 50 किलोपेक्षा अधिक आहे. तरुणांनी ही तोफ बाजूला काढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. परिसरातील काही जाणकारांनी ही तोफ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे तरुणांना आनंद झाला. ही बातमी तालुक्‍यात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरली. 

असे का घडले शस्त्रक्रियेनंतर मुलाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ 

आमचे पूर्वज भाग्यवान होते

आम्ही वन विभागाचे अधिकारी शंकर बेनके यांच्यामार्फत बितनगडावरील टाक्‍यातील गाळ काढत असताना दुपारी एक पुरातन लोखंडी तोफ सापडली. ती शिवकालीन असावी, अशी शक्‍यता वाटत आहे. आमचे पूर्वज भाग्यवान होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन व सहवास लाभला. 
- विठ्ठल पेढेकर, ग्रामस्थ, बिताका 

तोफ शिवकालीन असण्याची शक्‍यता 

बितनगड हा किल्ला यादवकालीन असून, शिवकाळात या परिसरातील सर्व किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अंमल होता. 1679मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या लुटीनंतर येथीलच विश्रामगडावर वास्तव्यास होते. बितनगड हा टेहळणीसाठीचा प्रमुख किल्ला होता. त्यामुळे आता मिळालेली तोफ ही शिवकालीन असण्याची शक्‍यता आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाकडून पाहणी होणे आवश्‍यक आहे. 
- विठ्ठल शेवाळे, इतिहास अभ्यासक, अकोले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivakalin cannon found at bitaka fort