Video : मोदी-शहांना जनता माफ करणार नाही ः जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

कोंढाणा किल्ला सर करण्याच्या छत्रपतींच्या इच्छेसाठी तानाजी मालुसरे यांनी आपला देह ठेवला. त्यामुळे आता अमित शहा कुठे आणि तानाजी मालुसरे कुठे. दोघांची तुलना करणे म्हणजे भारतीय जनता पक्षाला जुना पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे, की काय? असा सवाल निर्माण होतो.

सातारा : नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्याचा मोह भाजपला का होतोय हेच कळत नाही. आता तर अमित शहांची तानाजी मालुसरेंशी तुलना चालवली आहे; पण कुठे अमित शहा अन्‌ कुठे तानाजी मालुसरे. छत्रपती व मालुसरेंशी तुलना करून भाजपला जुना इतिहास पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे; पण ही तुलना महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही, असा इशारा जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी दिला. सैनिक स्कूलमधील वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी मंत्री पाटील आज साताऱ्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

हेही वाचा ः फडणवीस सरकारच्या काळात टॅंकर घोटाळा, आमदार रोहित पवारांना सापडला धागा

सातारा शहराच्या हद्दवाढीबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, ""आता बाळासाहेब पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. ते या स्थितीचा अभ्यास करून योग्य त्या सूचना राज्य सरकारला करतील आणि त्यातून हा प्रश्‍न मार्गी लावतील.'' दिल्लीच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, निवडणुकीत अमित शहांकडून तानाजी मालुसरे यांच्या नावाचा वापर केला जात आहे. याविषयी विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, ""नरेंद्र मोदींना सतत छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्याचा मोह का होतोय हेच कळत नाही. महाराष्ट्रात पदोपदी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत भाजप अशी वागणूक देत असल्याचा प्रचंड राग आहे. तानाजी मालुसरे यांची तुलना अमित शहा यांच्याशी करणे योग्य नाही. 

आवश्य वाचा ः मला नाईट लाईफ हे शब्दच आवडत नाही - उद्धव ठाकरे

कोंढाणा किल्ला सर करण्याच्या छत्रपतींच्या इच्छेसाठी तानाजी मालुसरे यांनी आपला देह ठेवला. त्यामुळे आता अमित शहा कुठे आणि तानाजी मालुसरे कुठे. दोघांची तुलना करणे म्हणजे भारतीय जनता पक्षाला जुना पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे, की काय? असा सवाल निर्माण होतो. कारण, तुलना करण्याचा त्यांचा स्वभाव काही जात नाही. त्यांच्या या स्वभावाला इलाज नाही.'' 

हेही वाचा ः महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही : खडसे

जलसंपदा विभागाची जागा मेडिकल कॉलेजसाठी दिली आहे. त्यासंदर्भातील आवश्‍यक ती कार्यवाही पूर्ण करून महिनाभरात हा प्रश्‍न मार्गी लागेल. त्यानंतर कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरू होईल, तसेच प्रलंबित जिहे- कठापूर योजनेचे पाणीही येत्या महिना- दोन महिन्यांत मिळेल. जिल्ह्यातील इतर सिंचन प्रकल्पांची कामेही लवकरच सुरू केली जातील, असेही मंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil Criticizes Narendra Modi And Amit shah In Satara