logo
logo

"जलयुक्त'ने फुलविले सोलापूरचे शिवार 

सोलापूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्‍टमधील महत्त्वाचा प्रोजेक्‍ट म्हणजे जलयुक्त शिवार अभियान. या अभियानात सोलापूर जिल्ह्याने राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये जलयुक्त शिवारचे भवितव्य अंधारात दिसत आहे. याच जलयुक्त शिवार अभियानाने सोलापूर जिल्ह्याचे शिवार फुलविले आहे. 2015-16 ते 2018-19 या वर्षात सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून 701 कोटी रुपयांच्या निधीतून जलसंधारणाची 74 हजार 47 कामे झाली आहेत. 
हेही वाचा - सोलापूरच्या बंडखोरांची सुनावणी सोमवारी, सभापती निवडी मंगळवारी 
जलयुक्त शिवार अभियानाची सुरवात झाल्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंडे काम पहात होते. मुंडे यांनी या अभियानासाठी नियोजन आणि निधीची उपलब्धता करून दिल्याने अभियानाच्या पहिल्याच वर्षी सोलापूर जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील मळेगावने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. मुंडे यांच्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी रणजितकुमार व आता डॉ. राजेंद्र भोसले यांनी या अभियानातील कामांना प्राधान्य दिले आहे. राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला सोलापूर जिल्हा आणि दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाधिक टॅंकर लागणारा जिल्हा अशी सोलापूरची ओळख आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागाला समृद्ध करण्यासाठी मोठी मदत झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात या अभियानातून कामे झाली परंतु पावसाने दडी मारली अशीच स्थिती 2016-17 मध्ये व 2018-19 मध्ये निर्माण झाली होती. पडलेल्या पावसाचे पाणी अडल्याने या भागातील दुष्काळाची दाहकता कमी होण्यास मदत झाली. 
हेही वाचा - शिक्षक कंटाळले गटबाजीला; लढाई सुरूच ठेवणार 
15 कामे झाली रद्द 
2018-19 या वर्षात सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची मागणी नसल्याने मंजूर झालेल्या कामांपैकी 15 कामे रद्द करण्यात आली आहेत. 
रद्द करण्यात आलेल्या 15 कामांमध्ये कृषी विभागाकडील सिमेंट बंधारे दुरुस्तीच्या सात कामांचा समावेश आहे. वनविभागामार्फत केल्या जाणाऱ्या खोल समतल चराच्या एका कामाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत केल्या जाणाऱ्या सिमेंट बंधारा दुरुस्तीच्या तीन, पाझर तलाव दुरुस्तीच्या तीन आणि कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या एका कामाचा समावेश आहे. 2018-19 या वर्षात सोलापूर जिल्ह्यात जलसंधारणाची 3 हजार 45 कामे जलयुक्त शिवार अभियानातून पूर्ण करण्यात आली आहेत. या कामापोटी 35 कोटी 29 लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com