"हर्र बोला हर्र'च्या जयघोषात होम प्रदीपन सोहळा

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 जानेवारी 2020

सोलापूर ः "एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, सिद्धेश्‍वर महाराज की जय'चा जयघोष, विद्युत दिव्यांनी लखलखलेले मानाचे सातही नंदीध्वज, पांढरेशुभ्र बाराबंदी पोशाख परिधान केलेले नंदीध्वजधारक आणि जमलेल्या हजारो भाविकांच्या साक्षीने आज रात्री होम मैदानावर कुंभारकन्येचा प्रतीकात्मक होमविधी सोहळा झाला. 

सोलापूर ः "एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, सिद्धेश्‍वर महाराज की जय'चा जयघोष, विद्युत दिव्यांनी लखलखलेले मानाचे सातही नंदीध्वज, पांढरेशुभ्र बाराबंदी पोशाख परिधान केलेले नंदीध्वजधारक आणि जमलेल्या हजारो भाविकांच्या साक्षीने आज रात्री होम मैदानावर कुंभारकन्येचा प्रतीकात्मक होमविधी सोहळा झाला. 

हेही वाचा ः अखेर कोल्हापूरला मिळाले "हे' पालकमंत्री 

होमविधीसाठी नंदीध्वजांची मिरवणूक दुपारी साडेचारच्या सुमारास हिरेहब्बू वाड्यातून निघाली. प्रारंभी, मानकरी देशमुख, हिरेहब्बू यांच्या हस्ते नंदीध्वजांची विधिवत पूजा करण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी नंदीध्वज मार्गस्थ होताना सुवासिनी नंदीध्वजांची मनोभावे पूजा करत होत्या. ही मिरवणूक पसारे वाडा, फौजदार चावडी पोलिस स्टेशनजवळ आल्यानंतर मानाच्या पहिल्या नंदीध्वजास नागफणा बांधण्यात आल्या. त्याचबरोबर नंदीध्वजास विद्युत दिवे बांधून रोषणाई करण्यात आली. त्यानंतर हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा केली. पूजेनंतर नागफणा पेलणाऱ्या व नंदीध्वज उचलून देणाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर नंदीध्वज होम मैदानाकडे मार्गस्थ झाले. 

हेही वाचा ः भाजपने दिली "या' चेहऱ्यांना पुन्हा संधी 

नंदीध्वज पावणेदहाच्या सुमारास होम मैदानावर आले. होम कट्ट्याजवळ दहाच्या सुमारास धार्मिक विधीला सुरवात झाली. बाजरीच्या पेंढीस प्रतीकात्मक कुंभारकन्या म्हणून सौभाग्यालंकार घालून त्या कुंभारकन्येस मणी, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे, हार-दांडा घालून सजविण्यात आले. विधिवत पूजा करून हिरेहब्बू यांच्याकडून रात्री साडेदहाच्या सुमारास होमास अग्नी देण्यात आला. त्यानंतर कुंभार यांना विड्याचा मान दिला गेला. नंतर होम कट्ट्यास नंदीध्वज प्रदक्षिणा घालून भगिनी समाजाजवळ आल्यानंतर देशमुखांच्या वासराची भाकणूक झाली. रात्री उशिरा नंदीध्वज मिरवणुकीने हिरेहब्बू वाड्यात दाखल झाले. फडीचा मानकरी व हिरेहब्बू यांना प्रसाद देऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

आज शोभेचे दारूकाम आणि लेझर शो 
सिद्धरामेश्‍वर यात्रेतील चौथ्या दिवशी उद्या (गुरुवारी) रात्री आठच्या सुमारास होम मैदानावर शोभेचे दारूकाम होणार आहे. यासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज मिरवणुकीने होम मैदानाकडे मार्गस्थ होतील. यंदा देवस्थानने शोभेच्या दारूकामात दोघांनाच संधी दिली असून, लेझर शोमधून श्री सिद्धरामेश्‍वर महाराजांचे चरित्र, वचन हे दाखविले जाणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur sidheshwar