esakal | स्वखर्चातून साकारली शिक्षकाने डिजिटल जंगल क्‍लासरूम !
sakal

बोलून बातमी शोधा

Jungle Classeoom

स्वखर्चातून साकारली शिक्षकाने डिजिटल जंगल क्‍लासरूम !

sakal_logo
By
उमेश महाजन

आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून तयार झालेल्या राज्यातील या डिजिटल जंगल क्‍लासरूमचे उद्‌घाटन शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

महूद (सोलापूर) : मुलांना शिक्षणाविषयी गोडी वाटावी, यासाठी सांगोला तालुक्‍यातील तरंगेवाडी अंतर्गत असलेल्या सांगोलकर-गवळीवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खुशालउद्दीन शेख या प्राथमिक शिक्षकाने पगारातील चार लाख रुपये खर्चून डिजिटल जंगल क्‍लासरूम (Digital Jungle Classroom) बनवली आहे. आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून तयार झालेल्या राज्यातील या डिजिटल जंगल क्‍लासरूमचे उद्‌घाटन शिक्षणाधिकारी संजय राठोड (Education Officer Sanjay Rathore) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. (A teacher from Sangola taluka built a digital jungle classroom at his own expense)

हेही वाचा: पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाइन ! कोरोनामुळे विद्यापीठाचा निर्णय

आधुनिक काळात विद्यार्थी खडू, फळा या पारंपरिक अध्यापनात रमणार नसल्याने, विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड असल्याने सांगोलकर- गवळीवस्ती येथील प्राथमिक शाळेच्या वर्गामध्येच जंगल तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केल्यावर व जंगलातील आवाज ऐकल्यावर आभासी जंगलात असल्याचा अनुभव येथे विद्यार्थ्यांना येतो आहे. एका वेगळ्याच विचाराने ही डिजिटल जंगल क्‍लासरूम साकारण्यात आली आहे. या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे, माजी गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव, विस्ताराधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर, केंद्रप्रमुख मनोहर इंगवले आदी उपस्थित होते.

सांगोलकर- गवळीवस्ती येथील प्राथमिक शाळेच्या वर्गामध्येच सहशिक्षक खुशालउद्दीन शेख यांनी पगारातील चार लाख रुपये खर्चून डिजिटल जंगल क्‍लासरूम तयार केली आहे. यामध्ये स्वखर्चातून वर्गात सुरू केलेले सीसीटीव्ही, ग्रंथालय, संगणक कक्ष, निओटर्फ हार्ड मॅट, सीलिंग फॅन, खिडक्‍यांना पडदे, बगीच्या, विद्यार्थी प्रगती फाइल, स्वाध्याय आठवडा पीडीएफ, राज्यातील शिक्षकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन मोफत कार्यशाळा या श्री. शेख यांच्या उपक्रमांची पाहणी शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी केली. यावेळी श्री. राठोड म्हणाले, खुशालउद्दीन शेख यांनी पगारातील चार लाख रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना जंगलातील शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी तयार केलेली ही डिजिटल जंगल क्‍लासरूम संकल्पना खूपच आनंददायी आहे.

हेही वाचा: कॉंग्रेसमुळेच होतेय भाजपचे मिशन लोटस पूर्ण : फारुख शाब्दी

डिजिटल जंगल क्‍लासरूम म्हणजे काय?

वर्गातील सर्व भिंतींवर जंगलातील प्राणी, झाडेझुडपे, पक्षी यांची चित्रे काढलेली आहेत. कृत्रिम प्लास्टिक झाडाच्या फांद्या, फुले, फळे, पक्षी यांची सजावट केली आहे. घनदाट जंगलाचा रात्रीच्या वेळेचा विद्यार्थ्यांना अनुभव येण्यासाठी डिजिटल लाइटिंग केली आहे. यावेळी वर्गात साऊंड सिस्टिमच्या साह्याने फॉरेस्ट साऊंड इफेक्‍ट म्हणजे वाहते पाणी, वारा, पक्षी व प्राण्यांचे आवाज, पडणारा पाऊस यांचा इफेक्‍ट दिला आहे. त्यामुळे वर्गात बसून विद्यार्थ्यांना जंगलात असल्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवसभर अध्ययनात गोडी निर्माण होते, असे शिक्षक खुशालउद्दीन शेख यांनी सांगितले.

आमच्या शाळेतील शिक्षक खुशालउद्दीन शेख यांनी लॉकडाउनच्या काळात वर्गातील एकही विद्यार्थी मोबाईल नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी गरजू गरीब विद्यार्थ्यांना पगारातून मोबाईल, सिमकार्ड घेऊन दिले. शाळेतील सर्व विद्यार्थ्याच्या मोबाईलवर ई- लर्निंग सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आहे.

- सुहास कुलकर्णी, मुख्याध्यापक

loading image