esakal | Solapur : खोदा पहाड..! 'एसटी'च्या शोधमोहिमेत केवळ दोनच फुकटे प्रवासी
sakal

बोलून बातमी शोधा

Ticket-Checker

राज्य परिवहन महामंडळाकडून विनातिकीट अर्थात फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी 22 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर दरम्यान शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

खोदा पहाड..! 'एसटी'च्या शोधमोहिमेत केवळ दोनच फुकटे प्रवासी

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून (State Transport Corporation) विनातिकीट अर्थात फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी 22 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर दरम्यान शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील आठ दिवसांत केवळ दोनच फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर विभागातील नऊ आगारात (ST Bus) जवळपास 70 जणांच्या पथकांकडून ही शोध मोहीम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र एवढ्या मोठ्या पथकाला आठ दिवसांत केवळ दोन फुकटे प्रवासी आढळून आल्याने 'खोदा पहाड तो निकला चुहा' अशी परिस्थिती दिसून आली.

गाडी बस स्थानकात आल्यानंतर अचानकपणे या पथकांकडून तिकीट तपासणी केली जात आहे. एखादा प्रवासी विना तिकीट आढळल्यास त्यांच्याकडून 100 रुपये अथवा तिकिटाच्या दुप्पट पैसे दंड स्वरूपात वसूल केले जात आहेत. दररोज साधारणपणे 300 ते 350 गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. सोलापूर विभागांतील 9 आगारांमध्ये तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र सोलापूर विभागातून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यंत नगण्य असल्याचे दिसून येत आहे. साधारपणे दररोज 50 हजार प्रवासी एसटी बसने प्रवास करीत आहेत. यात अगदी बोटावर मोजण्या इतके प्रवासी विना तिकीट प्रवास करीत असताना आढळून आल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: Solapur : 'विठ्ठल'च्या संचालकांचा वाद पवारांच्या दरबारात!

ठळक बाबी....

  • विना तिकीट प्रवाशांवर होणार कारवाई

  • कारवाईबरोबरच प्रवाशांचे केले जाणार प्रबोधन

  • 10 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार मोहीम

  • प्रवासी आणि दंडाच्या रकमेत वाढ होण्याची शक्‍यता

  • नऊ आगार आणि 70 जणांचे पथक

  • तीन सत्रात करण्यात येत कारवाई

इतर आठ ते 10 प्रकारच्या घटनांवर कारवाई

22 सप्टेंबरपासून सोलापूर विभागात विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी एसटीच्या नेमण्यात आलेल्या 70 जणांच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे चालक आणि वाहकांवर देखील यावेळी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वाहकांकडील तिकीटसाठी दिलेल्या रकमेत आणि जवळ असलेल्या रकमेत तफावत आढळून आल्याने देखील कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर उड्डाण पुलावरून गाडी घेउन जाऊ नये असे आदेश असताना देखील गाडी नेल्याच्या घटना घडल्याने कारवाई करण्यात आली आहे. एसटी ज्या मार्गावर जाणार आहे त्याचे नेमप्लेट व्यवस्थित न लावल्यानेही कारवाई करण्यात आल्याच्या 8-10 घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर नेमण्यात आलेल्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: राष्ट्रपती शौर्यपदक विजेते! खाकी वर्दीतील सिंघम हर्षद काळे

सोलापूर विभागात दररोज 300 एसटी गाड्यांची तपासणी केली जात आहे. सोलापूर विभागातील विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे. मागील आठ दिवसात तपासणी करण्यात आल्याने केवळ दोन प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले आहेत.

- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

loading image
go to top