esakal | शरद पवारांनंतर आता गणपतरावांच्या पावसातील भाषणाची चर्चा

बोलून बातमी शोधा

ganpatrao deshmukh

94 वर्षांचा तरूण 
वयाच्या 94 व्या वर्षीही पक्षवाढीसाठी झटणारा तरुण असेच गणपतराव देशमुख यांना संबोधले जात आहेत. वयाच्या 94 व्या वर्षीही त्यांनी पक्षनिष्ठा व तत्त्वनिष्ठता कधीही सोडली नाही. त्यांचा पुरोगामी राजकारणासाठी आजही संघर्ष सुरू आहे. 

शरद पवारांनंतर आता गणपतरावांच्या पावसातील भाषणाची चर्चा
sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सातारा येथील सभेतील पावसातील भाषण देशभर तुफाण गाजले होते. श्री. पवार यांच्या या एका भाषणामुळे निवडणुकीचे एकूण वातावरणच बदलेले होते. सध्या राज्यात आणखी एका पावसातील भाषणाची चर्चा सुरू आहे. ती म्हणजे शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पावसातील भाषणाची. 

हेही वाचा - सोलापूरच्या तेजस्विनीचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव 

वयाच्या 94 व्या वर्षीही सामाजिक प्रश्नासाठी व पक्षवाढीसाठी आजही ते सातत्याने झटत आहेत. राजकीय जीवनात एकनिष्ठता व तत्वनिष्ठता कधीही न सोडलेले नेते शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख होय. शंभरीकडे वाटचाल करणारे गणपतराव सध्या शेकापच्या पक्षवाढीसाठी युवक संघटनेचे तालुक्‍यात जाळे निर्माण करत आहेत. रविवारी तालुक्‍यातील महुद परिसरात युवक शाखेच्या उद्घाटन प्रसंगी अवकाळी पाऊस सुरू झाला तरीही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे थांबवले नाही. अशातच गावातील कार्यकर्त्यांनी आबासाहेबांच्या डोक्‍यावर छत्री धरली व त्या पावसातही त्यांनी आपले भाषण सुरु ठेवले. पावसातील त्यांच्या त्या भाषणाची चर्चा सध्या सर्वत्र व सोशल मीडियावर जोर धरत आहे. 

हेही वाचा - एकच वादा : कारखानदारीत पॉवरफुल्ल झाले अजितदादा 

2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रकृतीचे कारण पुढे करीत माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढण्याचे ठरवले. बालेकिल्ल्यात त्यांच्या माघारीने राजकीय पोकळी निर्माण झाली होती. परंतु आपले वारसदार म्हणून त्यांनी आपले नातू अनिकेत देशमुख यांना निवडणुकीत सामोरे केले. अनिकेत देशमुख यांचा अल्पशा मतात निवडणुकीत पराभव झाला. सध्या अनिकेत शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने वयाच्या 94 व्या वर्षीही माजी आमदार गणपतराव देशमुख यांनाच पक्षाची व पक्षवाढीसाठी झटावे लागत आहे. निवडणुकीत शेकापच्या पराभवानंतर आमदार गणपतराव देशमुख जिल्हा परिषद गटनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. मेळाव्यानंतर पक्षात तरुणांना संधी मिळावी यासाठी पुरोगामी युवक संघटनेच्या शाखा वाढीसाठी ते आवर्जून प्रयत्न करीत असताना दिसतात. 

सध्या सांगोला तालुक्‍यातील महुद गटांमध्ये युवकांच्या संघटना बांधणीसाठी व पुरोगामी युवक संघटनेची फळी निर्माण करण्यासाठी त्यांचे दौरे सुरू आहेत. नुकतेच ढाळेवाडी, महूद (ता. सांगोला) येथे युवकांसमोर मार्गदर्शन करीत असताना अचानक पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाची सुरुवात झाली. पाऊस सुरू झाला तरीही माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी आपले भाषण थांबवले नाही. यावेळी गावातील कार्यकर्त्यांनी शेजारच्या घरातून छत्री आणून बाबासाहेबांच्या डोक्‍यावर धरली. बाबासाहेबांचे मार्गदर्शन झाल्यावरच ते थांबले. पावसातही त्यांनी सुरू ठेवलेल्या भाषणाची चर्चा सध्या तालुकाभर व सोशल मीडियावर सुरू आहे.