मंगळवेढा नगरपालिकेसाठी आवताडेंची स्वतंत्र मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mangalwedha municipality

मंगळवेढा नगरपालिकेसाठी आवताडेंची स्वतंत्र मोर्चेबांधणी

मंगळवेढा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी निवडीवरून झालेली धुसफूस, जिल्हा बॅंकेचे ज्येष्ठ संचालक बबनराव आवताडे यांची स्वतंत्र राजकीय मोर्चेबांधणी पाहता आगामी मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा: लाचखोर पोलिस उपनिरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

मागील नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते राहुल शहा यांनी काँग्रेसचा आमदार असताना जागावाटपात थेट नगराध्यक्षपद पदरात पाडून घेतले. काँग्रेसवासी स्व. आमदार भारत भालके यांनी सात नगरसेवक विजयी करताना राष्ट्रवादीच्या विजयात योगदान दिल्याने राज्यातील सत्तेविरोधी पालिकेची सत्ता स्थापन केली. परंतु, यातील बहुतांश नगरसेवकांनी आता आमदार समाधान आवताडे यांच्याशी जवळीक साधल्यामुळे नवीन चेहरे उतरवले जाणार आहेत. यंदा नगराध्यक्ष नगरसेवकातून निवडला जाणार असल्यामुळे नगरसेवक होण्यासाठी चढाओढ सुरू झाली.

स्व. भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर मंगळवेढा शहराची जबाबदारी राहुल शहा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी बदलामुळे काही नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट शरद पवाराकडे धाव घेतली. परंतु त्यांची तक्रार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतली नसल्याने नाराज कार्यकर्ते असून या निवडणुकीत ते काय भूमिका घेतात याला महत्त्व आले आहे. पोटनिवडणुकीपासून जिल्हा बॅंकेचे माजी संचालक बबनराव आवताडे हे देखील सध्या गट मजबूत करण्यावर लक्ष देत आहेत. शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचे पुत्र खरेदी विक्री संघाचे सिध्देश्वर आवताडे हे सक्रीय असून ते नगरपालिकेत की जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरणार हे निश्‍चित नसले तरी त्यांची भूमिका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. सध्या त्यांनी कोणत्याही राष्ट्रीय पक्षासोबत समझोता केला नसल्यामुळे कोणत्या पक्षाच्या गळाला ते लागतात यावर नगरपालिकेच्या सत्तांतराचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा नगरपालिकेच्या वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा: 'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

आमदार समाधान आवताडे या मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे सारथ्य केले होते. यंदा त्यांना भाजपचे सारथ्य करावयाचे असल्यामुळे सध्या भाजप गोटात शांतता असली तरी ऐनवेळी आपली फौज तयार ठेवू शकतात. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीला शिवसेनेची साथ मिळणार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाची सरळ लढत होणार असली तरी राष्ट्रवादीतील नाराज आणि बबनराव आवताडे हे मात्र नगरपालिकेच्या सत्तांतराचे निमित्त ठरण्याची शक्‍यता आहे.

loading image
go to top