esakal | "बीएएमएस' डॉक्‍टरांच्या वेतनाला कात्री ! नागरी आरोग्य केंद्रांवरील डॉक्‍टर "काम बंद'च्या तयारीत

बोलून बातमी शोधा

Doctor
"बीएएमएस' डॉक्‍टरांच्या वेतनाला कात्री ! नागरी आरोग्य केंद्रांवरील डॉक्‍टर "काम बंद'च्या तयारीत
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना काळात आठ ते बारा तासांची ड्यूटी करीत नागरिकांचे लसीकरण, नागरी आरोग्य केंद्रावर आलेल्या प्रत्येकाची कोरोना टेस्ट करणे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरासमोर बॅरिकेडिंग करणे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची टेस्ट करण्याची जबाबदारी बीएएमएस डॉक्‍टर मागील आठ- दहा महिन्यांपासून करीत आहेत. त्यांना प्रत्येकी दरमहा 40 हजारांप्रमाणे मानधन दिले जात होते. मात्र, आता आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी उपायुक्‍तांचे आदेश रद्द करून त्या डॉक्‍टरांना जानेवारी 2021 पासून दरमहा 30 हजारांचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील 15 नागरी आरोग्य केंद्रांवर कोरोना काळात 16 एमबीबीएस आणि 50 बीएएमएस, बीएचएमएस व बीयूएमएस डॉक्‍टरांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्‍ती देण्यात आली आहे. दरम्यान, आयुर्वेदिक पदवीधारकांना ऍलोपॅथिक पदवीधारकांप्रमाणेच समकक्ष दर्जा प्रदान करण्यात आला असून, नगरविकास व सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाने काढलेल्या शासन निर्णयाचा आधार घेऊन "आयुष'चे संचालक डॉ. कुलदीप कोहली यांनी बीएएमएस, बीयूएमएस व बीएचएमएस या डॉक्‍टरांना दरमहा 60 हजारांचे मानधन द्यावे, असे आदेश काही दिवसांपूर्वीच काढले होते. मात्र, त्या डॉक्‍टरांना आता दरमहा 30 हजार रुपये देण्याचा निर्णय महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. कोरोना काळात स्वत:चे कुटुंब सोडून शहरातील कोरोना हद्दपार होण्यासाठी सेवा देत असतानाच आयुक्‍तांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा काम बंद करू, असा इशाराही दिला आहे.

हेही वाचा: तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? सीटी स्कॅनमधील स्कोअरवरून असे होते निदान

काय आहेत आयुक्‍तांचे आदेश?..

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना काळात 66 डॉक्‍टरांना तात्पुरती नियुक्‍ती दिली आहे. एकवट मानधनावर त्यांची नियुक्‍ती केली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एकवट मानधनात एकसूत्रीपणा आणण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन होती. 14 एप्रिल 2020च्या आयुक्‍त, आरोग्य सेवा व अभियान संचालकांच्या परिपत्रकानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एमडी डॉक्‍टरांना दरमहा 75 हजार रुपये तर एमबीबीएस (डीजीओ, ओबीजीवाय, डीसीएच, पीजीडीएपी, एफसीपीएस) या डॉक्‍टरांना प्रत्येकी 70 हजार रुपये तर एमबीबीएस डॉक्‍टरांना 60 हजार रुपये आणि उर्वरित डॉक्‍टरांना दरमहा 30 हजार रुपयांचे मानधन दिले जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

15 लाखांची वसुली होईल?

जानेवारी 2021 नंतर कोणत्या डॉक्‍टरांना किती मानधन द्यायचे, याबाबत आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सोमवारी (ता. 26) नवे आदेश काढले. तत्पूर्वी, जानेवारीपासून बीएएमएस, बीएचएमएस व बीयूएमएस डॉक्‍टरांना उपायुक्‍त धनराज पांडे यांच्या आदेशानुसार दरमहा 40 हजारांचे मानधन देण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी वाढवून दिलेली रक्‍कम अंदाजित 15 लाखांपर्यंत आहे. त्यामुळे ऑडिटमध्ये त्रुटी निघाल्याने ही रक्‍कम कोणाकडून वसूल होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: शहरात एकूण टेस्टमध्ये 12.45 टक्‍के लोक पॉझिटिव्ह ! उपमहापौरांच्या प्रभागात उच्चांकी मृत्यू

आयुक्‍तांनी निर्णय मागे घ्यावा

रुग्णांची हेळसांड होणार नाही, याची खबरदारी घेत सरकार व रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही काम करतोय. 1981 च्या शासन निर्णयाप्रमाणे एमबीबीएस व बीएएमएस डॉक्‍टरांना समकक्ष दर्जा दिला असून समान काम समान वेतन ठरविण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिकने 70 हजारांचे वेतन दिले आहे. त्यामुळे आयुक्‍तांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा पुढील दिशा ठरविली जाईल.

- डॉ. विनायक टेंभुर्णीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, निमा