
सोलापूर : तांबट, निखार, बुलबुल, सुगरणसह राखी धनेश पाहून आनंदले पक्षीप्रेमी
सोलापूर - तांबट, निखार, बुलबुल, सुगरणसह राखी धनेश पाहून पक्षीप्रेमी आनंदून गेले. जागतिक जैवविविधता दिनाचे औचित्य साधून सोलापूर वनविभाग, सोलापूर महापालिका, माझी वसुंधरा उपक्रम तसेच विविध पर्यावरणप्रेमी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धेश्वर वनविहार येथे पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निरीक्षणात पक्षी वैभव पाहून सर्व पक्षीप्रेमी हरखून गेले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ नरेंद्र गायकवाड यांनी ‘सोलापुरातील पक्षीवैभव व जैवविविधता दिनाचे महत्त्व’ यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. नंतर प्रत्येकी १० ते १५ जणांचा गट करून पर्यावरणप्रेमी पक्षी निरीक्षणासाठी रवाना झाले. प्रत्येक गटाला पक्ष्यांची व वन्यजीवांची माहिती देण्यासाठी डब्ल्यूसीएएसतर्फे एक मार्गदर्शक देण्यात आला होता. यामध्ये नरेंद्र गायकवाड, शिवानंद हिरेमठ, संतोष धाकपाडे, अजित चौहान, सुरेश क्षीरसागर यांचा समावेश होता.
या पक्षी निरीक्षण उपक्रमात निखार, बुलबुल, सुगरण, लाल पंखी होला, तांबट, राखी धनेश, खाटीक, कारुण्य कोकिळा, शिंजीर, वेडा राघू, नाचरा मोर, दयाळ, भारद्वाज, खंड्या आदी पक्षी तर पायोनियर, क्रिम्प्सन टीप, ऑरेंज टीप, स्पॉटेड जोकर, प्लेन टायगर, ग्रास यलो आदी फुलपाखरांची नोंद पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली.
या उपक्रमात महापालिकेचे पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर, पर्यावरण संरक्षण गतिविधीचे प्रवीण तळे, अनिल जोशी, वनविभागाचे कर्मचारी संजय भोईटे, शैलेश स्वामी व जयोस्तुते फाउंडेशनचे विद्यार्थी, श्रीकांत अंजुटगी, इको नेचरचे मनोज देवकर, सोशल कॉलेजचे प्रा. नारायणकर व विद्यार्थी, संगमेश्वर महाविद्यालय जिओग्राफी डिपार्टमेंटच्या मंजू संगेपांग व विद्यार्थी, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, मोहोळच्या झूलॉजी विभाग प्रमुख प्रा. वैशाली रूपनर, प्रा. स्वाती कोकाटे व विद्यार्थी, डब्ल्यूसीएएसचे मयांक चौहान, आनंद थळंगे, रोहित इटगी, प्रवीण गावडे आदी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. या उपक्रमात १५० जणांनी आपला सहभाग नोंदवला.
Web Title: Bird Watching At Siddheshwar Forest Vihara On The Occasion Of World Biodiversity Day
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..