कात टाकण्याच्या प्रक्रियेतील सर्वोपचार रुग्णालयात कर्करोग मात्र दुर्लक्षित | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कात टाकण्याच्या प्रक्रियेतील सर्वोपचार रुग्णालयात कर्करोग मात्र दुर्लक्षित!
कात टाकण्याच्या प्रक्रियेतील सर्वोपचार रुग्णालयात कर्करोग मात्र दुर्लक्षित!

कात टाकण्याच्या प्रक्रियेतील सर्वोपचार रुग्णालयात Cancer दुर्लक्षित

sakal_logo
By
अभय दिवाणजी

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (Chhatrapati Shivaji Maharaj Sarvopchar Rugnalaya) रुग्णसेवेबाबत कात टाकण्याच्या प्रक्रियेत आहे. अन्य आजारांच्या रुग्णांसाठी सोयी-सुविधा असल्या तरी कर्करुग्णांसाठी (Cancer) मात्र हे रुग्णालय उपचारापासून कोसो दूर आहे. अत्यंत 'क्रिटिकल' रोगावरही सर्वोपचार रुग्णालयात उपचार होतात. परंतु, सर्वात गंभीर असलेल्या कर्करुग्णांसाठी या रुग्णालयात किमोथेरपी व रेडिएशनची सोय नाही. कधीतरी शस्त्रक्रिया केल्या जातात. कर्करोगावरील उपचारासाठीच्या सोयी-सुविधांकरिता अजून प्रस्ताव पातळीवरच प्रशासन आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येच्या कर्करोगाचा सामना करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात सोय होण्याची गरज असल्याने किमान हा विभाग तातडीने सुरू झाल्यास बऱ्याच बाबी मार्गी लागतील.

हेही वाचा: एसटी महामंडळ विलिनीकरणात 'हे' अडथळे! निर्णयाची उत्सुकता

कोरोनासारख्या महामारीबाबत शासन पातळीवर तातडीने हालचाली झाल्या. या रोगाबाबत सर्व प्रकारच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. परंतु कर्करोगासारखा अत्यंत दुर्धर अशा आजाराबाबत शासन पातळीवर कोणत्याही प्रकारची आकडेवारी उपलब्ध नाही. देशभरात दरमहा अंदाजे आठ ते दहा लाख लोकांना कर्करोगाची लागण होत असल्याचे सांगण्यात येते. सोलापूर शहरात हे प्रमाण दरमहा 70 ते 80 आहे. बॉम्बे कॅन्सर रजिस्ट्रीने मुंबईपुरती मर्यादित अशा कर्करुग्णांची नोंद ठेवण्याचे काम हाती घेतले आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कसलीही माहिती अथवा नोंदी ठेवलेल्या आढळत नाहीत.

कर्करोगाचे तब्बल 640 प्रकार आहेत. गरिबी, अज्ञान आणि भीती यामुळे कर्करोग झालेला रुग्ण थेट तिसऱ्या अथवा चौथ्या टप्प्यातच डॉक्‍टरांकडे उपचारासाठी जातो, असा अनुभव आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात झालेला कर्करोग तातडीने उपचार केल्यास रुग्ण बरा होण्याचे प्रमाणही चांगले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परंतु तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात रुग्णांवर उपचार करता येतात. पण ती केस जवळपास हाताबाहेर जाण्याची शक्‍यता अधिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कर्करोग बरा करण्यामागील उशिरा उपचार हे मोठे कारण असल्याचे सांगितले जाते.

कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कै. अप्पासाहेब काडादी यांनी त्या काळात दूरदृष्टीतून सोलापुरात सिद्धेश्‍वर कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी केली. सध्या सोलापुरात जवळपास आठ-दहा खासगी डॉक्‍टर कर्करोगावर इलाज अथवा शस्त्रक्रिया करण्यात निपुण आहेत. अलीकडील काळात कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात रिलायन्सने कॅन्सर हॉस्पिटल उभारले आहे. सोलापुरातील कर्करुग्णांची आकडेवारी पाहिली तर शासकीय रुग्णालयात त्यावर उपचाराची सोय असायला हवी. परंतु आजतागायत ही सोय नाही. आर्थिक परिस्थितीअभावी उपचार घेण्यापासून रुग्ण दूर जातात, असे सांगण्यात येते. या रोगावर उपचार करण्यासाठी किमान चार लाखांपर्यंत खर्च होत असल्याचे सांगण्यात येते. काही खासगी प्रॅक्‍टिशनरकडून महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेद्वारे उपचार होतात.

बार्शीतील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वर्षाला सरासरी दहा हजार रुग्णांची तपासणी होते. गेल्या दीड वर्षात कोरोनाने थैमान घातल्याने येथील रुग्णसंख्येवर परिणाम झाला. एकूण रुग्णांच्या 80 टक्के रुग्णांचे प्रमाण हे लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, औरंगाबादसह मराठवाड्यातील आहे. सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात एकूण रुग्णातील पाच टक्‍के रुग्णांना कर्करोग झाल्याचे निदर्शनास आल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील काही रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागली. फार कमी रुग्णांवर शस्त्रक्रिया होते. रुग्णांना गरजेची किमोथेरपी व रेडिएशनची सोय नसल्याने अडचणी येत आहेत.

ठळक...

  • सोलापूर शहरात कर्करोगाचे दरमहा 70 ते 80 रुग्ण

  • बार्शीच्या नर्गिस दत्त कॅन्सर रुग्णालयात दरवर्षी दहा हजार रुग्णांची तपासणी

  • सर्वोपचार रुग्णालयातील एकूण रुग्णांपैकी कर्करोगाचे पाच टक्के रुग्ण

  • कर्करोगावरील उपचारासाठी शस्त्रक्रिया, किमोथेरेपी, रेडिएशनची गरज

  • मोफत उपचार करता यावेत म्हणून सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र विभागाचा शासनाकडे प्रस्ताव

  • औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्करोग विभागाची पाहणी करून निधी मागितला जाणार आहे

  • सर्वोपचार रुग्णालयामध्ये किमान 50 बेड कर्करोगासाठी असतील

  • शस्त्रक्रिया, किमोथेरेपी व रेडिएशनचा स्वतंत्र विभाग असेल

हेही वाचा: पहिली ते चौथीच्या शाळांचा बुधवारपर्यंत निर्णय !

वैद्यकीय सुविधांची सोय

सर्वोपचार रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचाराच्या सोयी करण्यात आल्या आहेत. दुर्बिण, लेसरद्वारे मोफत शस्त्रक्रिया, रुग्णालयातील व्हेंटिलेटरची संख्या दहावरून 70, सर्व आयसीयू बेड्‌सला ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. तर डायलेसिस बेड्‌सची संख्या दोनवरून 18 पर्यंत गेली आहे. इतके सारे एकीकडे आरोग्य यंत्रणेचे काम असले तरी कर्करोगाकडे मात्र म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही.

loading image
go to top