esakal | मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात पसरतोय कोरोना ! ग्रामपंचायत शासन-प्रशासन रंगवतेय कागदी घोडे
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात पसरतोय कोरोना ! ग्रामपंचायत शासन-प्रशासन रंगवतेय कागदी घोडे

sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव मंगळवेढा शहरापुरता मर्यादित नसून, तो आता ग्रामीण भागात हातपाय पसरू लागला आहे. ग्रामीण भागात प्रशासनाने नियुक्त केलेले कर्मचारी मात्र कागदोपत्री कामकाज रंगवत असल्याचे चित्र सध्या दिसत असल्याने वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्‍यात कोण आणणार, असा सवाल ग्रामीण भागातील जनतेतून विचारला जात आहे.

गाव पातळीवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेवक या नियुक्त कर्मचाऱ्यांनी दररोज याबाबत नियोजनबद्ध कामकाज करणे अपेक्षित आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतांश ग्रामपंचायतींनी गावोगावी फवारणी केली व सॅनिटायझरचे वाटप केले होते. मात्र या दुसऱ्या लाटेत कुठल्याही प्रकारची फवारणी ग्रामपंचायतीने केल्याचे दिसून येत नाही. बहुतांश ग्रामसेवक आणि तलाठी हे मंगळवेढ्यात बसूनच गावचा कारभार हाकत असल्यामुळे गावात काय चाललंय याची माहिती कोतवाल व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून घेऊन फक्त आढावा सादर करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी किमान या महिनाभराच्या कालावधीत मुख्यालयी राहून दैनंदिन परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

हेही वाचा: बारामतीकरांचा पाणी चोरण्याचा डाव उधळवून लावू ! खासदार नाईक-निंबाळकरांचा इशारा

या कराव्यात उपाययोजना...

  • प्रत्येक गावातील रुग्णांच्या कुटुंबाकडून मृत्यूच्या कारणांची शहानिशा करून त्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.

  • प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा व ग्रामसुरक्षा समितीने कोणत्या उपाययोजना केल्या व खबरदारी घेतली याचा आढावा घ्यावा.

  • प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या घेऊन सर्व स्टाफ पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे का, याची शहानिशा करावी.

  • वाढते रुग्ण व मृत्यूचे प्रमाण विचारात घेऊन खास बाब म्हणून अतिरिक्त वाढीव आरोग्य सुविधा आरोग्य केंद्रासाठी पुरवाव्यात.

  • संस्था विलगीकरण कक्षामध्ये सुविधांच्या अभावामुळे होणारी हेळसांड थांबवावी.

  • ज्या रुग्णांना होम क्वारंटाईनची अनुमती दिलेली आहे त्यांची नियमित तपासणी व्हावी.

  • ग्रामपंचायतीने गेल्या पंधरा दिवसांत प्रतिबंधात्मक कोणत्या उपाययोजना केल्या याचा आढावा घेऊन योग्य ते आदेश देण्यात यावेत.

  • कारणांशिवाय रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करावी.

  • चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, लसीकरण करणे यादृष्टीने ठोस कार्यक्रम आखावा.

हेही वाचा: "चुकीचं काही घडल्यास मी सोलापूर जिल्ह्यासोबत ! "उजनी'तील एक थेंब पाणी इतरत्र वळवू देणार नाही'

मरवडे येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रांताधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्याचा आदेश तब्बल पाच दिवस दडपून ठेवण्यात आला होता. वाढते रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढत असताना देखील कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे या बाबीकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.

- संजय पवार, ग्रामपंचायत सदस्य, मरवडे

loading image
go to top