esakal | बारामतीकरांचा पाणी चोरण्याचा डाव उधळवून लावू ! खासदार नाईक-निंबाळकरांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Nimbalkar-Pawar

बारामतीकरांचा पाणी चोरण्याचा डाव उधळवून लावू ! खासदार नाईक-निंबाळकरांचा इशारा

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : नीरा देवधरबरोबरच आता उजनीचं पाणी चोरण्याचा डाव बारामती आणि इंदापूरकरांनी आखला आहे. पण त्यांचा हा डाव उधळवून लावू, असा इशारा माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिला.

उजनी धरणातून इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयावरून सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. उजनीतून इंदापूरला पाणी देण्यावरून सरकार विरुद्ध शेतकरी असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: "चुकीचं काही घडल्यास मी सोलापूर जिल्ह्यासोबत ! "उजनी'तील एक थेंब पाणी इतरत्र वळवू देणार नाही'

मागील काही दिवसांपासून राज्य सरकारच्या या निर्णया विरोधात विविध शेतकरी संघटनांबरोबरच आता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे. यामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनीही उडी घेत थेट बारामतीकरांवर निशाणा साधला आहे.

खासदार निंबाळकर म्हणाले, नीरा देवधरचे दुष्काळी सांगोला, माळशिरस आणि पंढरपूरच्या काही भागाला मिळणारे पाणी सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच्या बारामतीकडे वळवले होते. अनेक वर्षे त्यांचा हा कारनामा सुरू होता. खासदार झाल्यानंतरच त्यांचा हा पाणी चोरीचा कारनामा मी उघड केला होता. दुर्दैवाने राज्यातील भाजपचे सरकार गेल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुष्काळी भागासाठी दिलेलं नीरा देवधरचे पाणी बारामतीकडे वळवले. त्यानंतर आता पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणातून इंदापूरसाठी पाच टीएमसी पाणी नेण्याचा घाट घातला आहे. हा निर्णय दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. या निर्यणाला माझा आणि भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे.

हेही वाचा: पालकमंत्री खोटे बोलले? "उजनी'तूनच द्यावे लागणार इंदापूरला पाच टीएमसी पाणी

जोपर्यंत शासनाकडून हा निर्णय रद्द केला जात नाही, तोपर्यंत रस्त्यावर उतरून लढाई करण्याची माझी तयारी आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी साथ द्यावी. भक्कम साथ मिळाली तर बारामतीकरांचा पाणी चोरीचा डाव उधळवून लावू. पुन्हा सोलापूर जिल्ह्याचा नाद केला नाही पाहिजे, अशी अद्दल घडवू, असा टोलाही खासदार निंबाळकर यांनी अजित पवारांना लगावला.

इंदापूरसाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी पाण्याचा निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यावा; अन्यथा सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही खासदार निंबाळकरांनी दिला आहे. खासदार निंबाळकरांच्या या इशाऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पाणी प्रश्नावरून राजकारण तापण्याची शक्‍यता आहे.

loading image