esakal | कोरोना पॉझिटिव्ह रेल्वे कर्मचाऱ्यांची वाढतेय संख्या ! रेल्वे ट्रेनिंग सेंटरमध्ये होणार उपचार

बोलून बातमी शोधा

Railway Hospital
कोरोना पॉझिटिव्ह रेल्वे कर्मचाऱ्यांची वाढतेय संख्या ! रेल्वे ट्रेनिंग सेंटरमध्ये होणार उपचार
sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे प्रशासनाकडून डॉ. कोटणीस मेमोरिअल रेल्वे हॉस्पिटल येथे कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र हॉस्पिटलमधील बेडची संख्या कमी पडत असल्याने आणि कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेल्वेच्या रामवाडी येथील मालधक्‍का येथे विभागीय ट्रेनिंग सेंटरमध्ये 20 रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

सोलापूर रेल्वे विभागात जवळपास दहा हजार रेल्वे कर्मचारी आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रेल्वे कर्मचाऱ्यांची बाधित संख्या कमी प्रमाणात होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे डॉ. कोटणीस मेमोरिअल रेल्वे हॉस्पिटलमध्ये अधिकारी आणि कर्मचारी उपचार घेत आहेत. डॉ. कोटणीस मेमोरिअल रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजनची सुविधा असलेले 35 बेड आहेत. मात्र दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील जागेअभावी रामवाडी येथील ट्रेनिंग सेंटर येथे येत्या दोन दिवसांत रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

हेही वाचा: सर्वांना उजनीतील पाण्याची चिंता तर कॉंग्रेसचा पालकमंत्रिपदावर डोळा !

ठळक बाबी...

  • 20 रुग्णांची होणार सोय

  • सिस्टर, वॉर्डबॉय, सफाई कामगार असणार

  • रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असणार सुविधा

  • होम क्‍वारंटाइनमधील रुग्णांना ठेवले जाणार

  • दिवसातून तीनवेळा डॉक्‍टरांकडून होणार तपासणी

विभागीय रेल्वे ट्रेनिंग सेंटरमध्ये होम क्‍वारंटाइनमधील कर्मचाऱ्यांना ठेवले जाणार आहे. या सेंटरमध्ये ऑक्‍सिजन सिलिंडर, तापमान मीटर, रक्तदाब, मधुमेहाची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर वेळेवर औषधे, जेवण आदींची सोय असेल. रेल्वेचे जवळपास 180 कर्मचारी होम क्‍वारंटाइनमध्ये असल्याने त्यांच्यावर विभागीय ट्रेनिंग सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत.

हेही वाचा: मेंढरं राखणारा, ऊसतोड करणारा लोटेवाडीचा आबा "आयईएस'मध्ये देशात 21 वा

आकडे बोलतात...

  • एकूण कर्मचारी : 10 हजार

  • एकूण बाधित कर्मचारी : 500

  • कोरोनाने मृत्यू : 15

  • होम आयसोलेशनमध्ये असलेले कर्मचारी : 180

  • कोरोनावर मात केलेले कर्मचारी : 350

डॉ. कोटणीस रेल्वे हॉस्टिलमध्ये सध्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र येथील जागा कमी पडत असल्याने येत्या दोन दिवसांत विभागीय ट्रेनिंग सेंटर येथे 20 रुग्णांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

- आनंद कांबळे, डॉ. कोटणीस रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर