esakal | "सैराट'मधील आर्चीचं गाव पुन्हा चर्चेत ! काय केलंय या गावानं?

बोलून बातमी शोधा

Aarchi
"सैराट'मधील आर्चीचं गाव पुन्हा चर्चेत ! काय केलंय या गावानं?
sakal_logo
By
अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता "सैराट'चे शूटिंग झालेल्या कंदर (ता. करमाळा) येथे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. करमाळा- टेंभुर्णी रस्त्यावर कंदर हे गाव आहे. पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कोव्हिड सेंटर उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासाठी तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गायकवाड, डॉ. अमोल डुकरे यांनी पाहणी केली आहे.

उजनी धरणाच्या काठावर वसलेल्या या गावचे नाव केळी उत्पादनात सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर आहे. केळीची बाग, रस्त्याच्या बाजूला असलेली नारळाची झाडं, लांबपर्यंत दिसणारी उसाची शेती, त्यात लक्ष वेधून घेणारा "आर्ची'चा बंगला असे "सैराट' चित्रपटातील दृश्‍यं सर्वांना आठवत असतील ना ! याच गावाने आता कोरोना काळात नागरिकांना मदत करण्यासाठी आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा: अक्कलकोटकरांच्या मदतीला धावला पुण्यातील स्वामीभक्त ! देणार 50 ऑक्‍सिजन बेड

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासनही जे हवं ते करत आहे. त्याला नागरिकही आता साथ देत असल्याचे दिसत आहे. यातूनच अनेक गावे प्रशासनाच्या मदतीला येताना दिसत आहेत. असंच कंदरने एक पाऊल पुढे टाकले आहे. आपल्या गावातील एकही रुग्ण बाहेर उपचारासाठी जाऊ नये म्हणून गावातच कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय या गावाने घेतला अन्‌ त्याचे कामही सुरू केले आहे.

उजनी धरणाच्या काटावर सोलापूर- नगर महामार्गावर हे गाव आहे. ऊस आणि केळी येथे मोठ्या प्रमाणात घेतली जाते. आपल्या भागात सुद्धा केळीचे उत्पन्न निघू शकते याचे उदाहरण या गावाने सर्वांना दाखवून दिले. सध्या केळीचे आगर म्हणूनही या गावाने ओळख निर्माण केली आहे. मराठी सिनेसृष्टीला नवीन ओळख निर्माण करून देणाऱ्या "सैराट' चित्रपटाचे चित्रीकरणही या गावात झाले होते. कोरोनाच्या संकटात सर्व हेवेदावे विसरून हे गाव पुढे आले आहे.

हेही वाचा: बदलत्या हवामानाचा होतोय शेतीवर विपरीत परिणाम ! काय आहे सद्य:स्थिती?

आपल्या गावातील एकही रुग्ण बाहेर उपचारासाठी जाऊ नये म्हणून प्रयत्न केला जात आहे. करमाळा तालुक्‍यात हे गाव असले तरी हाकेच्या अंतरावर माढा तालुक्‍यातील टेंभुर्णी आहे. एखादी व्यक्ती कोरोना पोझिटिव्ह आली तर अकलूज, सोलापूर, करमाळा किंवा बार्शीला उपचारासाठी जावे लागते. मात्र सध्याच्या परिस्थितीत तिथे सर्व सुविधा उपलब्ध होतीलच याची शक्‍यता नाही, म्हणून गावाने पुढाकार घेतला आणि गावातच सर्व सुविधा असलेले कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. याला प्रशासनानेही प्रतिसाद दिला. यासाठी ज्याला जे शक्‍य ती मदत केली. सध्या येते ऑक्‍सिजनची यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे.

याविषयी माहिती देताना भास्कर भांगे यांनी सांगितले की, कोव्हिडच्या साथीमुळे रुग्णांना बेड मिळणे मुश्‍किलीचे आहे. कंदर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून गावात कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यासाठी काम सुरू केले आहे. यात सामान्य बेड व ऑक्‍सिजन बेड असणार आहेत, ज्यामुळे गावातील रुग्णांना गावातच उपचार मिळू शकतील. ज्या गावांना शक्‍य आहे त्यांनी गावात कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यास हरकत नाही. सध्या गावासाठी काहीतरी करण्याचे दिवस आहेत. यातूनच गावाने पुढाकार घेतला आहे. सरपंच मनीषा भास्करराव भांगे, उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, ग्रामविकास अधिकारी सलीम तांबोळी यांच्यासह गावातील तरुण, ग्रामस्थ व बचत गट यांच्या सहकार्याने हे कोव्हिड सेंटर सुरू होत आहे.