esakal | अक्कलकोटकरांच्या मदतीला धावला पुण्यातील स्वामीभक्त ! देणार 50 ऑक्‍सिजन बेड

बोलून बातमी शोधा

Deepak Mankar
अक्कलकोटकरांच्या मदतीला धावला पुण्यातील स्वामीभक्त ! देणार 50 ऑक्‍सिजन बेड
sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : श्री स्वामी समर्थ भक्त दीपक मानकर हे अक्कलकोटकरांच्या कोरोनाच्या संकटसमयी मदतीला धावले असून, श्री स्वामी समर्थ रुग्णालयात सुरू असलेल्या डेडिकेटेड कोव्हिड सेंटरला नवीन 50 ऑक्‍सिजन बेड देणार असल्याची घोषणा केली आहे. या संकटकाळी कोरोना रुग्णांना आणि त्या रुग्णांची चिंता करणाऱ्या नातेवाइकांना दिलासा मिळणार आहे.

अक्कलकोट शहर आणि तालुक्‍याला कोरोनाने ग्रासले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही घातक ठरत आहे. या लाटेत मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. अशा संकटांचा सामना कसा करावा, यासाठी सर्जेराव जाधव सभागृह येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, फत्तेसिंह शिक्षण संस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, मारुती बावडे, डॉक्‍टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप घिवारे, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. विपुल शहा, डॉ. प्रमोद मजगे, डॉ. गिरीश साळुंखे, माणिक बिराजदार, शिवराज स्वामी यांनी बैठक घेऊन रुग्णसेवेसाठी कार्य करण्याचे ठरविले. यासाठी विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क संपर्क साधला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य विषयक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा: "या' रुग्णालयात होतेय ऑक्‍सिजनची चाळीस टक्के बचत ! रिझर्वायर बॅंगसह नॉन रीब्रिदिंग मास्कचा वापर

यात पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर दीपक मानकर, जे निस्सीम स्वामी समर्थ भक्त आहेत त्यांनी 50 ऑक्‍सिजन बेड सेवा दान देण्याचे मान्य केले. वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या श्री स्वामी समर्थ महाराज रुग्णालयात हे बेड दिले जाणार आहेत. डॉ. मनोहर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा केली जाणार आहे. या कामी शिवाजी मानकर आणि दत्ता सागरे यांचे सहकार्य मिळाले. परिणामी रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा: लसीकरण केंद्रावर नको गर्दी ! घरी बसूनच करा "अशी' ऑनलाइन नोंदणी

मी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त आहे. अक्कलकोटचे नागरिक कोरोना साथीने त्रस्त होऊ नयेत, गरीब व गरजू रुग्णांच्या उपचारात व्यत्यय येऊ नये यासाठी विचार करून 50 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था मी करणार आहे. त्याच्या खर्चाचा अंदाज काढून येत्या दोन- तीन दिवसात मी त्याची व्यवस्था करणार आहे. स्वामी नगरीसाठी काही करण्याची इच्छा मनात निर्माण झाली असल्याने रुग्णांची सोय होणार आहे, यात मला समाधान मिळेल.

- दीपक मानकर, स्वामीभक्त व माजी उपमहापौर, पुणे