esakal | Solapur : मंगळवेढा राष्ट्रवादीत पदाधिकारी निवडीवरून धुसफूस! शहर-ग्रामीण पदाधिकारी बदलाचा निर्णय वादात
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

मंगळवेढा शहर व ग्रामीण राष्ट्रवादीच्या पदाधिकारी बदलाचा निर्णय वादात सापडला आहे.

मंगळवेढा राष्ट्रवादीत पदाधिकारी निवडीवरून धुसफूस! निवड वादात

sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा (Mangalwedha) शहर व ग्रामीण राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकारी बदलाचा निर्णय वादात सापडला आहे. जिल्हाध्यक्ष बळिराम साठे (Baliram Sathe) यांनी एका गटाला नियुक्ती स्थगित करण्यात आल्याचे पत्र दिले तर दुसऱ्या गटाला जुनी व नवीन कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे पत्र देऊन घूमजाव केला. त्यामुळे आता नव्या पदाधिकारी निवडीचे अधिकार पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) व जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

हेही वाचा: जाता जाता पोलिस आयुक्‍तांचा दंगा नियंत्रण पथकाला दणका!

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि तालुक्‍यात राष्ट्रवादीचा तुल्यबळ गट असताना अपेक्षित मताधिक्‍य देता न आल्याने पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला. त्यानंतर तालुका संघटनेमध्ये मरगळ आली, अशी ओरड पक्षाच्या वतीने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत वरिष्ठांसमोर ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी केली होती. तसेच सत्ता असताना तालुक्‍यातच पदाधिकाऱ्यांची कामे होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

जिल्हा नेतृत्व आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करणे अपेक्षित असताना परस्पर निर्णय घेत ठराविक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सोयीचे पदाधिकारी निवडले. विश्वासात न घेता नवीन पदाधिकारी निवड झाल्याची तक्रार पक्षनेते अजित जगताप, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य विजय खवतोडे, नगरसेवक प्रवीण खवतोडे, प्रशांत यादव, बशीर बागवान, जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते, शहराध्यक्ष संदीप बुरुकुल, भारत बेदरे, मुझम्मिल काझी, संजय पवार, ज्ञानेश्वर भगरे, सुनील डोके, दयानंद सोनगे, विठ्ठल आसबे, सोमनाथ बुरजे, शशिकांत साखरे, नजीर इनामदार, बंडू बेंद्रे, मिलिंद ढावरे, बसवेश्वर सोनगे यांनी केली. तसेच जिल्हा राष्ट्रवादीत ठराविक पदाधिकाऱ्यांची मनमानी होत असल्याची तक्रारही केली.

दोन दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यात जिल्हाध्यक्ष साठे यांना पदाधिकारी निवडीबाबत विचारणा केली. तर नव्याने निवडलेल्या प्रकाश पाटील, बसवराज पाटील, तानाजी काकडे, चंद्रशेखर कोंडूभैरी यांच्यासह राहुल शहा, लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ आदी पदाधिकाऱ्यांनी बारामती येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे नव्याने होणाऱ्या निवडी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जुन्या व नव्या कार्यकारिणीतील प्रमुख 232 पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन निवड करण्याचे ठरले आहे.

हेही वाचा: तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदेंचा 'हा' विचार सर्वांनाच भावला

आता या नव्या कार्यकारिणीच्या निवडीसाठी जलसंपदामंत्री व पालकमंत्र्यांच्या बैठकीला कधी मुहूर्त लागणार, यावर नवीन कार्यकारिणी ठरणार आहे. तूर्त तरी जिल्हाध्यक्षांनी नव्या व जुन्या कार्यकारिणीला स्थगिती दिली आहे. पदाधिकारी निवडीवरून पंढरपूर राष्ट्रवादीत धुसफूस असतानाच आता मंगळवेढ्यातही धुसफूस सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी धुसफूस पोटनिवडणुकीला हानीकारक ठरली, तशी आता भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना देखील हानीकारक ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

loading image
go to top