पाटलांनंतर आता फडणवीस घेणार नगरसेवकांची तोंडी परीक्षा! | Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटलांनंतर आता फडणवीस घेणार नगरसेवकांची तोंडी परीक्षा!
पाटलांनंतर आता फडणवीस घेणार नगरसेवकांची तोंडी परीक्षा!

पाटलांनंतर आता फडणवीस घेणार नगरसेवकांची तोंडी परीक्षा!

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरच्या (Kolhapur) चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) पहिल्या राजकीय फेरीत नगरसेवकांच्या लेखी परीक्षेचा अहवाल सादर केला. तर दुसऱ्या फेरीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नगरसेवकांची तोंडी परीक्षा घेण्यासाठी सोलापूर (Solapur) दौऱ्यावर येत आहेत. या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नगरसेवकांना पुढच्या वर्गातील तिकीट मिळणार असल्याने पाच वर्षात मनमानी कारभार केलेल्या नगरसेवकांना मात्र प्रगती पुस्तकाची धडकी भरली आहे. लेखी परीक्षेत कमी गुण पडलेल्या नगरसेवकांनी आता तोंडी परीक्षेत पक्षनिष्ठा सिद्ध करून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण होण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

हेही वाचा: सिद्धिविनायक, शिर्डी सुटले; कॉंग्रेसच्या वाट्यातील पंढरपूर का लटकले?

शहर भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, एमआयएम, वंचित, माकप अशा छोट्या-मोठ्या पक्षांनी चहूबाजूंनी घेरले आहे. महापालिकेची निवडणूक ही भाजपसाठी आता प्रतिष्ठेची बनली आहे. बदलत्या सत्ताचक्रामुळे भाजपला महापालिकेची वाट बिकट झाली आहे. पक्षाला बाहेरून विरोध वाढत असल्याने पक्षांतर्गत गटबाजी दूर करण्यासाठी शहराध्यक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या सहा महिन्यांपासून भाजपने बूथनिहाय अभियानाला प्रारंभ केले आहे. या अभियानात नगरसेवकांच्या कामकाजाचा लेखाजोगा मांडणारा सर्व्हेचा विषयही घेण्यात आला होता.

या सर्व्हेचा लेखी अहवाल सादर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिला दौरा केला. त्यात त्यांनी नगरसेवकांच्या प्रगती पुस्तकाविषयो सूतोवाच करीत 90 टक्के नगरसेवक चांगले काम करत असल्याचे नमूद केले. परंतु ज्या नगरसेवकांबद्दलच्या तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या आहेत, अशांच्या उमेदवारीला कात्री लागण्याची शक्‍यता असल्याची चर्चा आहे, असे नगरसेवक पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी या दौऱ्याची चातकासारखे वाट पाहात आहेत. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा नगरसेवकांची संख्या अकराने वाढली आहे. त्यामुळे भाजपदेखील योग्य उमेदवारांच्या शोधात आहे. नव्या उमेदवारांच्या भेटी-गाठी, भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यमान नगरसेवकांची ओळख, नव्याने संधी देण्यात येणाऱ्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद अशी राजकीय मैफल फडणवीसांच्या दौऱ्यादरम्यान रंगणार आहे. महापालिका निवडणुकीची राजकीय मैफल रंगविण्यासाठी सोलापूरमध्ये ते मुक्‍काम ठोकणार असल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा: तरुणांमध्ये भरणे ठरले हिरो! MPSC उमेदवारांची वाढली वयोमर्यादा

'वन टू वन' संवाद

चंद्रकांत पाटलांनी सोलापुरातील नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या संयुक्‍त मेळाव्यात नगरसेवकांना कानपिचक्‍या देऊन पक्षीय धोरणांची आठवण करून दिली. जो-तो या मेळाव्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करत असल्याचा अहवालही वरिष्ठांकडे पाठविला. आता पाटलांनंतर देवेंद्र फडणवीस यांचा महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दौरा होणार आहे. या दौऱ्यात फडणवीस हे प्रत्येक नगरसेवकाशी 'वन टू वन' संवाद साधून जणू तोंडी परीक्षाच घेणार असल्याची चर्चा आहे. ज्या नगरसेवकांना लेखी परीक्षेत कमी गुण मिळालेत, त्यांच्यासाठी तोंडी परीक्षा महत्त्वाची ठरणार आहे.

बातमीदार : प्रमिला चोरगी

loading image
go to top