वीटच्या विशाल ढेरे पहील्या प्रयत्नात सहाय्यक निबंधक दुस-या प्रयत्नात सहाय्यक राज्यकर आयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vishal dhere

वीटच्या विशाल ढेरे पहील्या प्रयत्नात सहाय्यक निबंधक दुस-या प्रयत्नात सहाय्यक राज्यकर आयुक्त

करमाळा : मनात जिद्द ठेवून प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वीट(ता.करमाळा) येथिल विशाल अशोक ढेरे. राज्य लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच लागलेल्या निकालात सहाय्यक राज्य कर आयुक्त (वर्ग -1) म्हणून विशाल ढेरे याची निवड झाली आहे.

वीट येथील शेतकरी कुटुंबातील विशाल ढेरे यांनी राज्यसेवेच्या पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (वर्ग 2) हे पद मिळवले तर दुसऱ्या प्रयत्नात सहाय्यक राज्यकर आयुक्त (वर्ग 1 )हे पद मिळवले आहे. विशाल ढेरे चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वीट येथे झाले आहे. आई-वडील शेती करतात. विशाल ढेरे याचा  2016 साली मोटरसायकल अपघात झाला होता.

या अपघातात तो गंभीर जखमी झाला. विशाल ढेरे साधारणपणे सहा महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता दरम्यान पाय फ्रॅक्चर झाल्याने ऑपरेशन करावे लागले. उपचारानंतर प्रकृती हळूहळू साथ देत गेली. आपला एवढा मोठा अपघात झालेला असताना देखील खचून न जाता विशालने मोठ्या जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

राज्यसेवेच्या 2020 च्या निकालात त्याला सहाय्यक निबंधक हे पद मिळाले तर 2021 च्या निकालात सहाय्यक राज्य कर आयुक्त हे पद मिळाले आहे. याबाबत बोलताना विशाल ढेरे यांनी सांगितले की,  अपघात झाल्याने माझे उपचारासाठी लाखो रुपये खर्च वडिलांनी केला होता. आपला मुलगा व्यवस्थित झाला पाहिजे त्यासाठी माझ्या वडिलांनी प्रचंड कष्ट घेतले. अनेकांकडून हात उसने पैसे घेतले,वेळप्रसंगी  कर्ज काढले. 

अपघातानंतर माझी तब्येत मला साथ द्यायला लागल्यानंतर मी अभ्यास करायचे ठरवले. अभ्यास करत असताना पुण्यातचा  खर्च आपल्याला झेपणार नाही. म्हणून मी कोल्हापूर ,सांगली, इस्लामपूर या ठिकाणी राहून कमी खर्चात दिवस काढले. अभ्यास करत असताना कायम अभ्यासात सातत्य ठेवले. कधीही खचून गेलो नाही.पोस्ट मिळाली पाहीजे या भूमिकेतून अभ्यास करत राहीलो.

विशाल ढेरे याची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदी नियुक्ती झाल्याबद्दल वीट ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण गावातून घोड्यावरून मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. तर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट या शाळेत याचे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण झाले विद्यालयाच्या वतीने श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव देवीदास ढेरे, मुख्याध्यापक संजय कोळेकर यांच्या हस्ते विशाल ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी जयराम चोपडे, तन्मय जगदाळे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्य असणे खूप गरजेचे असते. अभ्यास करत असताना योग्य प्रकाशानाच्या पुस्तकाची निवड करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. खचून न जाता सातत्याने अभ्यास करत राहिल्यास निश्चिती यश मिळते. माझ्या यशामध्ये माझी आई वडील आणि सर्व कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे.

- विशाल अशोक ढेरे, सहाय्यक राज्य कर आयुक्त.

टॅग्स :Solapursolapur city