आमदार तानाजी सावंत अन्‌ शहाजी पाटलांच्या घरांना दोन शिफ्टमध्ये आठ पोलिसांचे संरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tanaji savant
आमदार तानाजी सावंत अन्‌ शहाजी पाटलांच्या घरांना दोन शिफ्टमध्ये आठ पोलिसांचे संरक्षण

आमदार तानाजी सावंत अन्‌ शहाजी पाटलांच्या घरांना दोन शिफ्टमध्ये आठ पोलिसांचे संरक्षण

सोलापूर : शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येऊनही पक्षाविरुद्ध बंडखोरी केलेल्या जिल्ह्यातील दोन्ही आमदारांच्या (तानाजी सावंत व शहाजी पाटील) घरांना व संपर्क कार्यालयांसह कारखाने व अन्य संस्थांना पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे. घरांसह सात संस्थांच्या ठिकाणी दोन शिफ्टमध्ये २८ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने मतदारांनी कौल दिला, पण मुख्यमंत्रिपदाच्या वादात महाविकास आघाडी तयार झाली. शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद आले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. पावणेतीन वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन होऊनही शिवसेनेच्या मंत्र्यांसह पक्षातील बहुतेक आमदारांना ‘आपले सरकार’ वाटलेच नाही. दुसरीकडे, अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुसऱ्याला मुख्यमंत्री करतील, असा विश्वासही शिवसेनेतील आमदारांना होता. पण, तसे काहीच न झाल्याची खदखद राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीतून उघड झाली. २० जूनला विधान परिषदेसाठी मतदान केल्यानंतर काही आमदारांनी थेट सुरत (गुजरात) गाठले आणि तेथून ते गुवाहाटीत गेले. दिवसेंदिवस एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या शिवसेना आमदारांमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे, सरकार अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली, विजय मिळाला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री असतानाही त्या आमदारांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी केली म्हणून राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. काहींनी आमदार तानाजी सावंत यांच्यासह काही आमदारांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड केली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दोन्ही आमदारांच्या घरांसह त्यांच्या संस्थांना संरक्षण पुरविले आहे.

दोन शिफ्टमध्ये २८ पोलिसांचा बंदोबस्त
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी पाटील हे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. पण, आता त्यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी करीत एकनाथ शिंदेंना साथ दिली. दुसरीकडे, माजी मंत्री तानाजी सावंत (रा. वाकाव, ता. माढा) हे उस्मानाबाद जिल्ह्यातून आमदार झाले आहेत, पण त्यांचे घर, संपर्क कार्यालय व काही कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. दोन्ही आमदारांच्या घरांसह त्यांच्या सात संस्थांनाही पोलिस बंदोबस्त दिला गेला आहे. त्या ठिकाणी दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी दोन पोलिस कर्मचारी ड्यूटी करत आहेत. दिवसातून दोनवेळा स्थानिक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी भेट देत आहेत.