सोलापुरातील वस्तुस्थिती! बांधकाम परवान्यात पार्किंग, तरी वाहने रस्त्यावर; मालमत्तांची पुन्हा होणार पडताळणी

कागदोपत्र सादर केल्यानंतर बांधकाम परवाना मिळतो, पण प्रत्यक्षात त्यानुसार कार्यवाही झाली की नाही, याची पडताळणी बहुधा केली जात नाही. पार्किंगची जागा कागदोपत्री असतानाही बहुतेक अपार्टमेंट, बंगल्याबाहेर रस्त्यावरच वाहने उभी कशी, हा संशोधनाचा विषय बनला आहे.
अपार्टमेंट, बंगल्याबाहेर रस्त्यावरच वाहने उभी
अपार्टमेंट, बंगल्याबाहेर रस्त्यावरच वाहने उभीसंग्रहित छायाचित्र

सोलापूर : महापालिकेकडून बांधकाम किंवा व्यावसायिक परवाना घेताना त्याठिकाणी पार्किंग, मोकळी जागा सोडण्याची अट घातली जाते. कागदोपत्री आराखडा सादर केल्यानंतर बांधकाम परवाना मिळतो, पण प्रत्यक्षात त्यानुसार कार्यवाही झाली आहे की नाही, याची पडताळणी बहुधा केलीच जात नाही. पार्किंगची जागा कागदोपत्री असतानाही शहरातील बहुतेक अपार्टमेंट, बंगल्याबाहेर रस्त्यावरच वाहने उभी कशी, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

शहरात ग.व.सू.सह जवळपास दोन लाख ८९ हजार मालमत्ताधारक आहेत. परंतु, महापालिकेकडून कधी बांधकाम परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज करायला सांगितला जातो तर कधी ऑफलाईन. त्यातच पुन्हा वेळेवर परवाना मिळत नाही. त्यामुळे कधीतरी पुढे परवाना मिळेल म्हणून अनेकांनी परवान्याची वाट न पाहताच बांधकामाला सुरवात केली आहे. अनेकांची बांधकामे देखील पूर्ण केली. काहींना अजूनही त्यानुसार कर आकारणी झालेली नाही, ही बाब आता सुरु असलेल्या सर्वेक्षणातून समोर येत आहे. परवाना नसतानाही बांधकाम केलेल्यांना आता तिप्पट कर आकारणी केली जाणार आहे. त्यांचे बांधकाम अधिकृत होईपर्यंत संबंधितांना तेवढा कर भरावा लागणार आहे.

सर्व्हेक्षणाचे असणार दोन टप्पे

महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी शहरातील सर्वच मालमत्तांची पडताळणी सुरू केली आहे. मागील अनेक वर्षांपासून मालमत्तांचे सर्वेक्षण झाले नव्हते. अनेकांनी बांधकाम वाढविले, मोकळ्या जागेत बांधकामे झाली. रेसिडेन्शियल जागेत व्यवसाय थाटला, अशी उदाहरणे समोर येत आहेत. आता पहिल्या टप्प्यात संबंधितांनी बांधकाम करताना महापालिकेचा परवाना घेतला की नाही, याची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर प्रत्यक्षात मोजणी करून बांधकाम परवान्याप्रमाणे पार्किंग, मोकळी जागा सोडली आहे का, त्याचा वापर होतोय का या बाबी पडताळल्या जाणार आहेत.

अशी आहे वस्तुस्थिती...

  • नवीपेठेसह मुख्य चौकांमधील मोठमोठ्या दुकानांसमोर पार्किंग नसल्याने उभी असतात चारचाकी वाहने

  • डफरीन चौक ते जुना एम्प्लॉयमेंट रोडवर रात्री उभी असतात रस्त्यावरच वाहने

  • सदर बझार, जुळे सोलापूर, टिळक चौक, भवानी पेठ, मधला मारुती, शिंदे चौक, शेळगीसह अन्य ठिकाणीही अशीच स्थिती

  • अपार्टमेंटमधील रहिवाशांची वाहने रस्त्यावर कशी? पार्किंग अपुरी असताना परवाना मिळालाच कसा हाही प्रश्न

  • रस्त्याच्या फुटपाथवरच (पंचकट्टा, विजयपूर रोड, जुना पूना नाका) थाटली दुकाने अन् भाजी मंडई; रस्त्यालगत हातगाड्यांची गर्दी

अतिक्रमणाला पाठबळ कोणाचे?

महापालिकेचे कामकाज करणे सोयीचे व्हावे म्हणून शहराचे आठ झोन करण्यात आले आहेत. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी नेहमीच त्या त्या परिसरात फिरत असतात. टॅक्स बिलांचे वाटप वारंवार होतेच. तरीसुद्धा शहरात वाढलेले अतिक्रमण त्या अधिकाऱ्यांना दिसले नाही कसे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. वाढलेल्या अतिक्रमणाला पाठबळ कोणाचे, याचे उत्तर महापालिकेतील कोणाकडेच नाही, हे विशेष. आता अतिक्रमणाचा विळखा काढण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आहे. शहरातील अतिक्रमणाचा विळखा सुटून शहर मोकळा श्वास घेणार का, ही जबाबदारी कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com