esakal | Solapur : 'उत्तर'च्या सभापतीवर अविश्‍वास ठराव! भाजपकडून निवडून येऊन शिवसेनेत केला होता प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तर सोलापूरच्या सभापतीवर अविश्‍वास ठराव!

उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला आहे.

उत्तर सोलापूरच्या सभापतीवर अविश्‍वास ठराव!

sakal_logo
By
संतोष सिरसट - सकाळ वृत्तसेवा

उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुका (North Solapur Taluka) पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे (Rajani Bhadkumbe) यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला आहे. चार सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीच्या सभागृहात तीन सदस्यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अविश्वास ठराव दाखल केला आहे.

साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सभापती भडकुंबे या भाजपकडून निवडून आल्या होत्या. मात्र अडीच वर्षांनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून सभापतिपद मिळविले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे आज (शुक्रवारी) पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र शीलवंत, सदस्य हरिभाऊ शिंदे, संध्याराणी पवार, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, माजी सदस्य इंद्रजित पवार यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.

हेही वाचा: निवडणुकीपूर्वी पहिले भाषण सोलापुरातच केलं अन्‌ भाजप सरकार पडलं!

जिल्ह्यातील सर्वात लहान पंचायत समिती म्हणून उत्तर सोलापूर पंचायत समिती गणली जाते. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत दोन सदस्य भाजपचे, एक राष्ट्रवादीचा व एक सदस्य शिवसेना म्हणजेच माजी आमदार दिलीप माने यांच्या गटातील आहे. पहिल्या अडीच वर्षात पवार सभापती तर भडकुंबे उपसभापती झाल्या होत्या. अडीच वर्षानंतर भडकुंबे यांनी माने गटात प्रवेश केला. त्यावेळी राष्ट्रवादी व माने गटाने एकत्र येत भडकुंबे यांना सभापती तर राष्ट्रवादीच्या शीलवंत यांना उपसभापती केले होते. भडकुंबे यांनी पक्षबदल करत सभापती पद मिळवले होते. मात्र भाजपचे माजी सदस्य इंद्रजित पवार यांना ही गोष्ट खटकली होती. तेव्हापासून ते संधीच्या शोधात होते. ती संधी चालून आल्यानंतर त्यांनी इतर सदस्यांना एकत्र करत अविश्वास ठराव दाखल केला आहे.

माने गटाचे सदस्य शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. सकाळी त्यांना शुभेच्छा देऊन सगळ्यांनी मिळून हा ठराव दाखल केला आहे. शिंदे यांना सभापती करण्याची मागणी वारंवार केली जात होती. मात्र, माजी आमदार माने यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

सभापती भडकुंबे या इतर सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नव्हत्या. प्रशासकीय कामात त्या ढवळाढवळ करत होत्या. अधिकाऱ्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करत होत्या. कोरोनाच्या काळात लोकांच्या सोईची कामे करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर अविश्वास दाखल करत असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या ठरावात म्हटले आहे.

हेही वाचा: NCPचा कॉंग्रेसला धक्‍का! माजी महापौर, माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादीत

पुढचा सभापती कोण?

अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर पुढचा सभापती कोण? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. इंद्रजित पवार, जितेंद्र साठे, हरिभाऊ शिंदे यांच्या बैठकीत नेमके काय शिजले आहे, हे तालुक्‍यातील जनतेला कळण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

loading image
go to top