esakal | Solapur : ढासळलेल्या बालेकिल्ल्यात 'साहेब' तैनात
sakal

बोलून बातमी शोधा

NCP president Sharad Pawar

सोलापूरसाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार नेहमीच धावून आले आहेत.

ढासळलेल्या बालेकिल्ल्यात 'साहेब' तैनात

sakal_logo
By
प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

सोलापूर जिल्ह्यावर आलेले कोरोनाचे संकट असो की जिल्ह्यातील लहान-मोठ्या व्यक्तींच्या निधनानंतर सात्वंनाचा विषय असो की वधू-वरांना आशीर्वाद देण्याचा विषय असो, सोलापूरसाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार नेहमीच धावून आले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगानंतर पक्षाध्यक्ष पवार पहिल्यांदाच आता सोलापुरात राजकारणासाठी येत आहेत. ढासळलेल्या बालेकिल्ल्यात ‘साहेब’ तैनात झाल्याने विरोधकांसह मित्र पक्षांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा: साधना बँकेकडून 'श्री शरद पवार गुणवंत कन्यारत्न' पुरस्काराची घोषणा

राज्यातील सत्ता गमावल्यानंतरही भाजपने विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळत रणजितसिंह मोहिते-पाटील यांना विधानपरिषदेवर संधी दिली. दिलेला शब्द पाळण्यात सध्याच्या घडीला फडणवीस आणि भाजप उजवी ठरत असल्याचा अनुभव जिल्ह्याला येऊ लागला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्यात अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जिल्ह्याला फारशा अपेक्षा नव्हत्या. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये जिल्ह्याला सर्वाधिक अपेक्षा या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच होत्या. राष्ट्रवादीने सोलापूर जिल्ह्याला हक्काचा आणि भूमिपुत्र पालकमंत्रीच दिला नाही. त्यामुळे विधानपरिषद आणि महामंडळात सध्या तरी अपेक्षा ठेवणे निरर्थकच आहे.

हेही वाचा: शरद पवार यांच्याकडून पहिल्या निवडणुकीला उजाळा

जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांचे असलेले स्थान कोणीही मिळवू शकत नाही ही नेहमीची चर्चा होते. पक्षाध्यक्ष पवार आणि राष्ट्रवादीने जेवढी ताकद विजयसिंह मोहिते-पाटील यांना दिली, तेवढी ताकद जिल्ह्यातील अन्य कोणत्या नेत्यांना (प्रा. लक्ष्मण ढोबळे अपवाद) दिली नाही. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते तयार झाले. परंतु त्यांची ओळख राज्याच्या राजकारणात आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जिल्ह्याला झाली नाही. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील, आमदार कै. भारत भालके हे जुने नेते असोत की नव्या दमाचे आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, उत्तमराव जानकर यांच्यात क्षमता असूनही संधी मिळाली नाही. ढासळलेला बालेकिल्ला कसा दुरुस्त होणार? मोहोळ-माढ्यापुरती मर्यादित असलेली राष्ट्रवादी पुन्हा कशी विस्तारणार? यासह अनेक प्रश्‍नांनी कार्यकर्त्यांच्या मनात काहूर माजविले आहे.

हेही वाचा: कोरोना कालखंडातही रयत शिक्षण संस्थेची भूमिका महत्त्वाची: शरद पवार

शहर सुधरतयं, ग्रामीण खदखदतयं

सोलापूर शहरात आहे त्या नेत्यांवर महापालिकेच्या सत्तेची स्वप्न पाहण्यापेक्षा सत्तेसाठी किंगमेकर ठरणाऱ्यांच्या हातावर घड्याळ बांधून महापालिकेतील सत्तेचे टायमिंग साधण्यात राष्ट्रवादीला जास्त इंटरेस्ट दिसत आहे. नव्या नेत्यांच्या इनकमिंगमुळे सोलापुरातील राष्ट्रवादी भविष्यात गुटगुटीत असेल यात शंका नाही. ग्रामीणमध्ये जिल्ह्याच्या नेतृत्वाचा प्रश्‍न कायम आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा चेहरा कोण? हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत असल्याने सत्ता आहे. परंतु कोणाकडे पाहून राष्ट्रवादीत जायचे? हा प्रश्‍न सुटताना दिसत नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात यातील काही प्रश्‍नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

loading image
go to top