'परिवहन'ने कसली कंबर! 'कार्तिकी'साठी येणाऱ्या भाविकांसाठी खासगी वाहनांची सोय | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'कार्तिकी'साठी येणाऱ्या भाविकांसाठी खासगी वाहनांची सोय
'परिवहन'ने कसली कंबर! 'कार्तिकी'साठी खासगी वाहनांची सोय

'कार्तिकी'साठी येणाऱ्या भाविकांसाठी खासगी वाहनांची सोय !

पंढरपूर (सोलापूर) : एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप (ST Strike) सुरू केला आहे. परिणामी, राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या संपाचा कार्तिकी यात्रेवरही (Kartiki Yatra) परिणाम होण्याची शक्‍यता आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी परिवहन विभागानेही (Maharashtra State Transport Corporation) कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूरला (Pandharpur) कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांकरिता खासगी वाहनांची सोय केली आहे, अशी माहिती सोलापूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली.

हेही वाचा: चंद्रभागा परिसर फुलू लागला! प्रशासनाने पुरवल्या सोयीसुविधा

पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथील बस स्थानकातून दररोज 125 एसटी फेऱ्यांद्वारे हजारो प्रवाशांची वाहतूक केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडचण निर्माण झाली आहे. त्यातच स्थानिक नागरिकांची गैरसोय सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी परिवहन विभागाने खासगी प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सोय करण्यासाठी खासगी वाहनांची सोय केली आहे. खासगी वाहन मालकांनीही याला चांगला प्रतिसाद दिला आहे. सध्या कार्तिकीसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक खासगी वाहनांतून पंढरपूला येऊ लागले आहेत.

एसटीच्या उत्पन्नावर पाणी

गत दोन वर्षांपूर्वी कार्तिकीसाठी 877 बसमधून दोन लाख 50 हजार भाविकांनी प्रवास केला होता. त्यातून एसटीला चार कोटी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. संपामुळे एसटीला कार्तिकीच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. तरीही पोलिस संरक्षणात प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे.

हेही वाचा: मारुती चितमपल्ली म्हणाले, हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही, तर...

50 खासगी वाहनांद्वारे सुरळीत केली प्रवासी वाहतूक

पंढरपूर आगारातून शुक्रवारी परिवहन अधिकाऱ्यांनी थांबून जवळपास 50 खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक सुरळीत केली. येथील बसस्थानकातून दिवसभरात सोलापूर, अकलूज, सांगोला, मंगळवेढा, टेंभुर्णी या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरळीत केली. परिवहन विभागाचे निरीक्षक महेश रायबान, सुखदेव पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सिद्धाराम कोलाटे, ऐश्वर्या धूल, धीरज डोईफोडे यांनी स्वतः थांबून प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, एसटी तिकिटापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाईल, असेही मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान यांनी सांगितले.

loading image
go to top