esakal | सांगोला तालुक्‍यातील चार हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ 
sakal

बोलून बातमी शोधा

सांगोला तालुक्‍यातील चार हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

सांगोला तालुक्‍यातील चार हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : महाविकास आघाडीची महत्वकांक्षी योजना म्हणून राज्यभर चर्चेत असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा सांगोला तालुक्‍यातील 4 हजार 117 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. सहकारी आणि राष्ट्रीयकृत अशा बॅंकांचे 23 कोटींचे कर्जे पहिल्या टप्प्यात माफ होणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक मोहन शिंदे यांनी दिली. 

हेही वाचा - भीमा कारखान्याचा निढा वाढला, राजकीय आरोप-प्रत्यारोप 

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे, आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा करण्यात आली. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जमुक्तीसाठी ही योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तालुक्‍यातील 75 विकास सेवा सहकारी संस्थांचे 1 हजार 906 खातेधारक शेतकरी तर राष्ट्रीयीकृत बॅंकांचे 2 हजार 211 इतक्‍या खातेधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांचे 15 कोटी 2 लाख 96 हजार इतके तर सहकारी बॅंकांचे 7 कोटी 99 लाख 56 हजार 474 रुपये अशी एकूण 23 कोटी 2 लाख 52 हजार 474 रुपयांची कर्जमाफी होणार आहे सहकारी व राष्ट्रीयीकृत अशा एकूण 4 हजार 117 लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

हेही वाचा - बळीराजासाठी! ठिबक अनुदानासाठी 20 फेब्रुवारीची डेडलाईन 

शेतीच्या वीज बिलात सवलत मिळावी 
कर्जमुक्ती बरोबरच शेतकऱ्यांना वीजबिलामध्येही सवलत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दुष्काळामुळे तालुक्‍यातील सर्रास विद्युत पंप बंद होते. परंतु तरीही वीज आकारणी केली जात होती. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीपंपाच्या विजबिले थकित गेली आहेत. शेतकऱ्यांसाठी शेतीमधील विद्युत पंपाच्या बिलांमध्येही सवलत मिळावी अशी मागणीही शेतकऱ्यांमधून सध्या होत आहे. 

ठराविक युनिट वीज मोफत द्या 
प्रत्येक वेळेलाच कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना पीकदराची हमी देण्यात यावी. दराची हमी मिळाल्यास शेतकरी वर्गाला कर्जमाफीची गरज भासणार नाही. तालुक्‍यातील सततच्या दुष्काळामुळे सध्याच्या राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी शेती पंपामध्ये ठराविक युनिट वीज मोफत द्यावी. 
- धनंजय चव्हाण, शेतकरी, हलदहिवडी, ता. सांगोला

loading image