esakal | पालकमंत्री हताश ! म्हणाले "डॉक्‍टरांच्या पाया पडतो, त्यांनी कोव्हिड सेंटरसाठी पुढाकार घ्यावा'

बोलून बातमी शोधा

bharne mama
पालकमंत्री हताश ! म्हणाले "डॉक्‍टरांच्या पाया पडतो, त्यांनी कोव्हिड सेंटरसाठी पुढाकार घ्यावा'
sakal_logo
By
अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पाहिजे ते कष्ट मी घेण्यासाठी तयार आहे. आता खासगी डॉक्‍टर मंडळींनी पुढाकार घेऊन या लढाईत सहभागी व्हावे. मी करमाळ्यातील सर्व डॉक्‍टरांच्या पाया पडतो, पण कोव्हिड सेंटरसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुका आढावा बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी आमदार नारायण पाटील, शिवसेनेच्या महिला नेत्या रश्‍मी बागल, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: मृत्यूदरात "दक्षिण' पहिल्या तर अक्‍कलकोट दुसऱ्या क्रमांकावर ! उपचाराच्या विलंबामुळेच वाढले मृत्यू

या वेळी दत्तात्रय भरणे म्हणाले, करमाळ्यातील डॉक्‍टरांनी पुढाकार घेणे गरजेचे असून, प्राप्त परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व तेवढी मदत शासन करायला तयार आहे. जिल्ह्यात आचारसंहिता असल्यामुळे मी दीड महिना या भागात येऊ शकलो नाही. याचा अर्थ मी गप्प होतो असा नाही. जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे मी रोजच्या रोज रिपोर्ट घेत होतो. आता मात्र इथून पुढे मी जिथे अडचण असेल तेथे जायला तयार आहे. शंभर लोकसंख्येची वस्ती असेल तरी तेथे जाऊन लोकांचे प्रश्न सोडवला तयार आहे. अशा प्रसंगी राजकारण करण्यापेक्षा एकमेकांच्या अडचणी समजून अडचणीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.

पालकमंत्री भरणे यांची भावनिक साद

या वेळी अत्यंत भावनिक होऊन बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी मी आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात आढावा बैठक घेत आहे. परिस्थिती सर्वत्र गंभीर आहे. आता खऱ्या अर्थाने या परिस्थितीत खासगी सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांनी पुढाकार घेऊन गावोगावी कोव्हिड सेंटर उभा केली पाहिजेत. मी तळागाळात काम केलेला कार्यकर्ता असून सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. जिथे जिथे अडचण असेल तेथील प्रत्येक नागरिकाने मला थेट भ्रमणध्वनी करावा, माझा फोन 24 तास सुरू असतो.

हेही वाचा: कोव्हिड केअर सेंटरमध्येच अपुरे मनुष्यबळ ! तीन डॉक्‍टरांवर "सिंहगड'ची जबाबदारी

शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मुद्‌द्‌याने गाजवली बैठक

या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शंभर कोव्हिड सेंटर उभा करावे, ऑक्‍सिजन , रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा पुरवठा पारदर्शक करावा, ऑक्‍सिजन व इंजेक्‍शन अभावी लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशा करमाळा तालुक्‍यातील 26 रुग्णांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत द्यावी. खासगी रुग्णालय व मेडिकलमधून जी रुग्णांची लूट सुरू आहे त्याला पायबंद घालावा. पावती न देता मेडिसिन विकणाऱ्या औषध विक्रेत्यांचे परवाने तत्काळ रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. मेडिकलमधून विक्री होत असलेल्या औषधांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावे, अशा मागण्या केल्या.

बातमीदार : अण्णा काळे

सकाळ वृत्तसेवा