
सोलापूर - नगरपालिका स्थापन झाल्यावर 1873 ते 1938 या 80 वर्षांच्या कालावधीत नगरपालिकेची आठवेळा हद्दवाढ झाली. विशेष म्हणजे नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर 61 वर्षांनंतर रेल्वे स्टेशन परिसराचा समावेश नगरपालिका हद्दीत झाला. दरम्यान, शहर हद्दीचा पहिला जाहीरनामा 1866 मध्ये प्रसिद्ध झाला.
1866 नंतर 1871 मध्ये शहराच्या हद्दी निश्चित करण्यात आल्या. या वेळी शेळगीचा नाला, जीआयपी रेल्वे व लष्कर व कसबे सोलापूर, मोदीखाना, लष्कर, सोलापूर किल्ल्याचा पश्चिम व दक्षिण दिशेला असलेला परिसर समाविष्ट करण्यात आला. न्यू कॅन्टोन्मेंटच्या ईशान्येकडील भाग व इतर आसपासचा भाग 20 जानेवारी 1890 रोजी नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला. लष्करची छावणी उठवल्यानंतर त्या ठिकाणच्या मोकळ्या जागेत लोकवस्ती झाली. हा भाग शहर हद्दीत आल्यावर तिऱ्हे गाव हद्दीतील लोकांची त्यांचा भाग शहर हद्दीत घेण्याची मागणी सुरू झाली. या भागात रेल्वेचे कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी व गार्डस रहात होते. सध्या या भागाला तिऱ्हेगाव म्हणून ओळखले जाते, तो हा भाग नव्हे. लक्ष्मी-विष्णू गिरण्या ज्या ठिकाणी आहेत त्या भागाला तिऱ्हेगाव म्हणून ओळखले जात होते. या भागातील घाणीचा शहरालाही उपद्रव होऊ लागल्याने हा भाग शहरात समाविष्ट करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी आर. ए. कॅन्डी यांनी खूप प्रयत्न केले. त्यानुसार 29 मार्च 1893 रोजी हा भाग हद्दीत समाविष्ट करण्यात आला. तिऱ्हेगावचा शहर हद्दीत समावेश झाल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर नगरपालिकेने या भागातील अस्वच्छता दूर करण्यासाठी दोन झाडूवाले व एका सफाई कामगाराची नियुक्ती केली.
1913 पर्यंत रेल्वे स्टेशन नगपालिकेच्या हद्दीत समाविष्ट नव्हते. त्यामुळे रेल्वेच्या इमारतींवर नगरपालिकेला करही मिळत नसे. म्हणून रेल्वे स्टेशनचा परिसर शहर हद्दीत समाविष्ट करण्यासाठी नगरपालिकेने सरकारकडे मागणी केली. त्यानुसार 13 डिसेंबर 1913 रोजी स्टेशनचा परिसर पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला. यानंतर 14 वर्षांत शहर हद्दीत कोणताच बदल झाला नाही. 1927 मध्ये शेळगीनजीकच्या 397 एकरची जमीन शहर हद्दीत समाविष्ट करण्यात आली. हा बदल होण्यापूर्वी शहराचे क्षेत्रफळ 4160 एकर होते, ते आता 4557 एकर झाले.
शहर हद्दीत सर्वात मोठा बदल 1938 मध्ये झाला. या वेळी जवळजवळ 900 एकर जमीन शहर हद्दीत समाविष्ट करण्यात आली. त्यासंबंधीचा हुकूम 20 जून 1938 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. शहराच्या पश्चिम व दक्षिण भागाकडील सर्व जागा शहर हद्दीत समाविष्ट झाल्याने शहराचे क्षेत्रफळ 5532 एकर झाले. हा शहराच्या क्षेत्रफळाचा उच्चांक म्हणता येईल. कारण 30 एप्रिल 1940 रोजी सेटलमेंटचा भाग नगरपालिका हद्दीतून वगळण्यात आला. त्यामुळे शहराचे क्षेत्रफळ 30 एकरांनी कमी झाले. 1953 पर्यंत शहराची हद्द इतकीच होती. 1866 मध्ये शहराच्या हद्दी निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर 1873 मध्ये शहराचे क्षेत्रफळ 511 एकर 36 गुंठे होते. 1953 मध्ये शहराचे क्षेत्रफळ 5502 एकर होते. म्हणजेच 1873 ते 1953 या कालावधीत शहराची 4990 एकर चार गुंठे इतकी वाढ झाली.
असा झाला शहर हद्दीच्या मर्यादेचा पहिला जाहीरनामा
कसबा, मंगळवार आणि शुक्रवारपेठेभोवती तट होते. शहर तटाबाहेर शनिवार पेठ, बेगम, साखर, गणेश, सिद्धेश्वर, बुधवार, सोमवार, पाच्छा अशा तुरळक वस्तीच्या लहान लहान पेठा असल्याचा उल्लेख आढळतो. नगरपालिकेचे सदस्य विष्णू गोविंद यांनी 1865 मध्ये नगरपालिकेच्या बैठकीत सरकारने हद्द निश्चित करून द्यावी, या मागणीचा प्रस्ताव मांडला. त्यावरून 1865 पर्यंत तरी नगरपालिकेची हद्द निश्चित केली गेली नसावी, असे दिसते. या ठरावानंतर 1866 मध्ये सोलापूर नगरपालिका शहर हद्दीबाबतचा पहिला जाहीरनामा गॅझेटमधून सरकारने प्रसिद्ध केला. त्यानुसार शहराची मोतीबागेपासून देगाव नाल्यापर्यंत वाहणाऱ्या नाल्याच्या काठाने व पुढे रेल्वेच्या 14 कमानी खालून शेळगी नाल्यापर्यंत तुळजापूर रस्त्यापासून हैदराबाद रस्त्यावरील तिरकस पुलापर्यंत हद्द ठरविण्यात आली. हद्दीची निश्चित मर्यादा दाखविणारा हा पहिलाच जाहीरनामा होता.
हेही वाचा - ऐतिहासिक सोलापूर - 01
हेही वाचा - ऐतिहासिक सोलापूर - 02
हेही वाचा - ऐतिहासिक सोलापूर - 03
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.