esakal | हॉटेलचालकांना भीती लॉकडाउननंतरच्या मंदीची 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरवात झाल्यापासूनच सोलापुरातील हॉटेल व्यवसायावर टप्प्याटप्प्याने परिणाम होऊ लागला होता. मांसाहार करण्यास विशेषतः: चिकन खाण्यास आजही लोक घाबरत आहेत. लॉकडाउन हटविल्यानंतर देखील सर्वसामान्य लोक पर्यटनासाठी बाहेर येण्याची व बाहेरचे पदार्थ खाण्याची शक्‍यता कमीच आहे. हॉटेल व्यावसायिकांसाठी हे संपूर्ण वर्षच बिकट स्थितीत जाणार आहे. 
- उदय भागवत, सचिव, सोलापूर हॉटेल असोसिएशन 

हॉटेलचालकांना भीती लॉकडाउननंतरच्या मंदीची 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट ही आध्यात्मिक स्थळं आहेत. सोलापूरच्या शेजारी असलेल्या तुळजापूर, गाणगापूर या तीर्थक्षेत्रामुळे सोलापुरात कायमस्वरूपी पर्यटक असतात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा परिणाम सर्वच व्यवसायांवर होऊ लागला आहे. लॉकडाउन हटविल्यानंतरही हॉटेल व्यवसायावर आर्थिक मंदीचे सावट काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - कामगारांसाठी मोठा निर्णय! दोन टप्प्यात मिळणार पाच हजार रुपये 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवीत आहे. या उपाययोजना राबवत असताना आपल्यातील व्यवसाय व रोजगारही टिकला पाहिजे, अशी मागणी होऊ लागली आहे. सोलापुरातील लॉकडाउन अंशतः: शिथिल करून येथील व्यवसाय व रोजगार सुरू केल्यास व या व्यवसायातील सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर वापरण्याबाबतची जबाबदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर सोपविल्यास यातून मार्ग निघू शकतो. सोलापूर शहरात जवळपास 500 हॉटेल, परमीट रूम व बार, लॉजिंग आहेत. या शिवाय सोलापुरात मटण भाजनालयांची संख्या मोठी आहे. या सर्व व्यवसायावर व या व्यवसायाला आवश्‍यक असलेल्या (दूध, भाजीपाला, लॉन्ड्री, किराणा) व्यवसायावर 20 हजारांहून अधिक लोक अवलंबून आहेत. कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापुरात असंघटित कामगारांची संख्या अधिक आहे. सोलापुरातील हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्यातील कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. मार्च महिन्यातील पूर्ण वेतन बहुतांश हॉटेल चालकांनी दिले आहे. एप्रिल व मे च्या वेतनाबाबत अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. 

हेही वाचा - भाजीपाल्याच्या वाहनातून अवैध दारू वाहतूक 


सकारात्मक निर्णय अपेक्षित 
आमच्या असोसिएशनमध्ये 108 हॉटेल व्यावसायिक सभासद आहेत. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची योग्य ती काळजी आम्ही घेत आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच आपल्यातील व्यवसाय, अर्थव्यवस्था हे देखील टिकले पाहिजेत. त्यासाठी शासनाच्या वतीने सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. 
- राजकुमार सुरवसे, अध्यक्ष, सोलापूर हॉटेल असोसिएशन 
आम्ही जबाबदारी स्वीकारली 
सर्वांना जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशाचे पालन हॉटेल व्यावसायिक करत आहेत. या शिवाय हॉटेल व्यावसायिकांवर प्रशासनाच्या वतीने सोपविण्यात आलेली जबाबदारीही आम्ही पार पाडत आहोत. 
- प्रियदर्शन शहा, ज्येष्ठ सदस्य, सोलापूर हॉटेल असोसिएशन