esakal | दगडू ते सुशीलकुमार अन्‌ कोर्टातील पट्टेवाला ते केंद्रीय मंत्री!
sakal

बोलून बातमी शोधा

दगडू ते सुशीलकुमार अन्‌ कोर्टातील पट्टेवाला ते केंद्रीय मंत्री!

सोलापूर जिल्ह्यात 4 सप्टेंबरला 1941 रोजी एका मागासवर्गीय कुटुंबात दगडू नावाच्या मुलाचा जन्म झाला.

दगडू ते सुशीलकुमार अन्‌ कोर्टातील पट्टेवाला ते केंद्रीय मंत्री!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर जिल्ह्यात (Solapur) 4 सप्टेंबरला 1941 रोजी एका मागासवर्गीय कुटुंबात दगडू नावाच्या मुलाचा जन्म झाला. दगडूच्या वडिलांचे नाव संभाजीराव (Sambhajirao) व आईचे नाव सखूबाई (Sakhubai) होते. या दाम्पत्याला चार मुले झाली; त्यातील तिघांचा अकाली मृत्यू झाला. एकटा दगडू राहिला. त्याचे नाव दगडू ठेवण्यामागे विशेष कारण होते. एकापाठोपाठ मुलांचा मृत्यू झाला की, मुलांची नावे दगडू, धोंडू ठेवत. अशा नावाच्या मुलांना देवही नेत नाही, अशी समजूत होती. म्हणूनच त्याचं नाव दगडू ठेवले होते. पुढे या दगडूने नाव बदलले आणि सुशीलकुमार झाले. हे सुशीलकुमार म्हणजे दुसरे - तिसरे कोणी नाहीत तर ते आहेत सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)!

हेही वाचा: राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेचा 'या' दिवशी निकाल! 2019 चा निकाल लांबला

सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री याबरोबर विविध महत्त्वाच्या पदांवर काम पहिले आहे. सुशीलकुमार शिंदे हे 23 एप्रिल 1974 रोजी करमाळा मतदारसंघातून विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले होते. 1972 मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीत कॉंग्रेसकडून शिंदे यांना करमाळा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार होती; परंतु शेवटच्या क्षणी तायप्पा सोनवणे यांना ती उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत सोनवणे हे विजयी झाले. यामुळे शिंदे यांची द्विधा मनःस्थिती झाली. कारण, त्यांची नोकरीही गेली होती. त्यांनी पोलिस विभागातील नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नोकरीही गेली आणि उमेदवारीही. पुढे त्यांनी मुंबईत वकिली सुरू केली.

मात्र करमाळा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले सोनवणे यांचे वर्षभरातच निधन झाले. त्यामुळे येथे पोटनिवडणुका जाहीर झाल्या. कॉंग्रेसने शिंदे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत शिंदे 25 हजार मतांनी विजयी झाले. तेथून पुढे त्यांनी विविध राजकीय पदे मिळवली. शिंदे मुंबईत नोकरी करत असतानाच अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचा संबंध येत होता. करमाळा विधानसभा पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा विधानसभेवर पोचलेले सुशीलकुमार शिंदे पुढे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले.

हेही वाचा: शाळा बंदमुळे अल्पवयीन मुलींच्या कपाळी बाशिंग !

सुशीलकुमार शिंदे यांचे मूळचे घराणे परंडा तालुक्‍यातील माकडाचे उपळे! त्यांचे पणजोबा तिथे राहात होते. त्यांचे आजोबा शिवराम. पुढे त्यांनी गाव सोडले व ते व्यवसायानिमित्त सोलापूरला आले. मेलेल्या जनावरांची कातडी काढणे व त्यावर प्रक्रिया करणे हा त्यांचा व्यवसाय होता. सुशीलकुमार यांची आई सखूबाई या संभाजीराव यांच्या चौथ्या पत्नी होत्या. पहिल्या बायकोला मूल होत नव्हते म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. दुसरीही मुल झाले नाही म्हणून तिसरी केली. तिसऱ्या बायकोचे अकाली निधन झाले. आता शिंदे आणि सोलापूर असे समीकरण रूढ झाले आहे. सुशीलकुमारांचे वडीलही पिढीजात चर्मोद्योग करायचे. त्यांच्या अंगी व्यवसायाचे कसब होते. मुंबईत त्यांचे स्वदेशी स्टोअर्स नावाचे एक खरेदी केंद्र होते. व्यवसायामुळे श्रीमंत लोकांत त्यांची उठबस असायची.

शैक्षणिक प्रवास

सुशीलकुमारांचा बालपण ते राजकारणपूर्व जीवन प्रवास खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खालावत गेली. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची (शिपाई म्हणून) नोकरी मिळाली. वकिलांना पुकारायचे ते काम होते. एकीकडे शिरस्तेदारांची नोकरी आणि दुसरीकडे शाळा सुरू होती. हातात दोन पैसे येत असल्याचे समाधान होते. नोकरी करीत असताना त्या वेळी शाळेत बसविलेल्या नाटकातही काम केले. न्यायालयात दहा वर्षे नोकरी केल्यानंतर तेथे बढती मिळून क्‍लार्कची जागा मिळाली. 1965 मध्ये बीएची पदवी घेतल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला आणि कायद्याच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तेथे विद्यार्थी चळवळीतही सहभाग घेतला. त्या वेळी शरद पवारांशी भेट झाली. काकासाहेब गाडगीळांनीही मदतीचा हात दिला. कायद्याचे शिक्षण आणि विद्यार्थी चळवळ सुरू असतानाच त्या वेळी वर्तमानपत्रात पोलिस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यांना उपनिरीक्षक म्हणून नोकरी मिळाली, तिच्यातूनच मुंबईत सीआयडी विभागात नवी नोकरी सुरू झाली. ही नोकरी करीत असतानाच सुशीलकुमारांनी एल्‌एल्‌बीचे शिक्षण पूर्ण केले.

राजकीय प्रवास

सुशीलकुमार शिंदे 16 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 2004 ते 2006 या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही आरूढ होते. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात असून मनमोहनसिंग मंत्रिमंडळात गृह खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे व लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते होते.

loading image
go to top