esakal | वेळ लागेल पण दूध पंढरीला पुनर्वैभव मिळेल! प्रशासक पांढरे, गावडे यांचा विश्‍वास
sakal

बोलून बातमी शोधा

वेळ लागेल पण दूध पंढरीला पुनर्वैभव मिळेल! प्रशासक पांढरे, गावडे यांचा विश्‍वास

एकेकाळी सोलापूरच्या अर्थकारणाचा आणि राजकारणाचा आत्मा असलेला सोलापूर दूध उत्पादक व प्रक्रिया संघ (दूध पंढरी) आज मोडकळीस आला आहे.

वेळ लागेल पण दूध पंढरीला पुनर्वैभव मिळेल !

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : एकेकाळी सोलापूरच्या (Solapur) अर्थकारणाचा (Economics) आणि राजकारणाचा (Politics) आत्मा असलेला सोलापूर दूध उत्पादक व प्रक्रिया संघ (दूध पंढरी) (Doodh Pandhari) आज मोडकळीस आला आहे. आपल्या जिल्ह्यातील या संस्थेला पुन्हा उभा करण्यासाठी प्रशासक म्हणून काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. या जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून दूध संघाच्या हितासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व गोष्टी आम्ही करत आहोत. जिल्ह्यातील काही नेतेमंडळी त्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असली तरीही राज्य पातळीवरील काही नेत्यांचे आम्हाला पाठबळ आहे. शेतकऱ्यांचा हा दूध संघ जिवंत राहिला पाहिजे, दूध संघाला पुनर्वैभव मिळाला पाहिजे अशीच राज्यस्तरावरील त्या नेत्यांची आणि आमची भावना आहे. आम्ही कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. थोडा वेळ लागेल पण दूध संघाला पुनर्वैभव नक्कीच मिळेल, असा विश्‍वास दूध संघाच्या प्रशाकीय मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे (Shriniwas Pandhare) व मंडळाचे सदस्य आबासाहेब गावडे (Abasaheb Gawde) यांनी "कॉफी विथ सकाळ'मध्ये (Coffee With Sakal) व्यक्त केला. "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी (Abhay Diwanji) यांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा: जिल्ह्याला अजून हवेत 57 लाख डोस! 24.75 लाख व्यक्‍ती वेटिंगवरच

अकरा संस्थांकडे 89 लाख थकित

मोहोळ तालुक्‍यातील सिद्धेवाडी येथील लोकसेवा सहकारी दूध संस्था, मंगळवेढा तालुक्‍यातील सोनाई दूध संस्था, शिरनांदगी येथील सिद्धनाथ दूध संस्था, राहटेवाडी येथील प्रभावती महिला दूध संस्था, आंधळगाव येथील गुरुदत्त दूध संस्था, तळसंगी येथील अहिल्यादेवी महिला दूध संस्था, चिंचाळे येथील दत्त दूध संस्था, पंढरपूर तालुक्‍यातील खरसोळी येथील रोकडोबा दूध संस्था, करमाळा तालुक्‍यातील बिचितकर वस्ती येथील श्रीराम दूध संस्था, सांगोल्यातील गणेशरत्न दूध संस्था, सांगोला तालुक्‍यातील पारे येथील कै. साळुंखे-पाटील दूध संस्था या 11 संस्थांकडे दूध ऍडव्हान्स, गाय खरेदी व पशुखाद्य येणे बाकीचे तब्बल 89 लाख 70 हजार 128 रुपये थकित आहेत. मोहोळ तालुक्‍यातील शेटफळ परिसरातील लोकसेवा आणि जनश्रद्धा या दूध संस्थांकडे 55 लाख रुपयांची थकबाकी आहे. या दोन्ही संस्थांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांनी नोटीस न स्वीकारल्याने आता त्यांना क्रिमिनल नोटीस बजाविण्यात आली आहे.

वाशीतील जागा विक्रीला मान्यता

दूध संघावर सध्या 25 कोटी रुपयांचे कर्ज आहे. दरमहा 22 ते 25 लाख रुपये फक्त व्याजापोटीच भरावे लागतात. दूध संघावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी दूध संघाची जागा विक्री केल्याशिवाय सध्यातरी पर्याय नाही. वाशी येथील दूध संघाची 1 हजार 16 चौरस मीटर जागा, यंत्रसामग्रीसह विक्री करण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने परवानगी मागितली होती. त्यांना ही परवानगीही मिळाली होती. या जागा विक्रीला मध्यंतरी स्थगिती मिळाली आहे. ही स्थगिती उठवावी यासाठी आम्ही पाठपुरावा केला. आम्हाला परवानगी मिळाली आहे. लवकरच येथील जागा विक्रीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचेही पांढरे व गावडे यांनी सांगितले.

हेही वाचा: आंतरजिल्हा बदलीसाठी 11 हजार शिक्षक इच्छुक! दिवाळीनंतर बदल्या

टेंभुर्णी, पंढरपूरच्या जागेसाठी प्रस्ताव

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव विक्रम शिंदे यांनी विठ्ठल को-ऑप. मिल्क प्रोड्यूसर अँड प्रोसेसर या मल्टिस्टेट संघाच्या माध्यमातून टेंभुर्णी येथील जिल्हा दूध संघाची मालमत्ता, यंत्रसामुग्री भाडेकरारावर चालविण्यासाठी मागितली आहे. या जागेचे व यंत्रसामग्रीचे मूल्यांकन केले असता येथून दरमहा सात ते साडेसात लाख रुपये भाडे दूध संघाला मिळणे आवश्‍यक आहे. सध्या वापरात नसलेली ही मालमत्ता भाडे तत्वावर देता येईल, परंतु त्यासाठी योग्य भाडे आवश्‍यक आहे. विक्रम शिंदे यांनी फक्त दरमहा 25 हजार रुपये भाडे देण्याचा प्रस्ताव दिला आहे. पंढरपूर तालुका दूध संघानेही पंढरपुरातील दूध संघाच्या मालकीची जागा व यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर चालविण्यास मागितली आहे. टेंभुर्णी आणि पंढरपूरचा प्रस्ताव नाममात्र भाड्याचा आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून हे प्रस्ताव नसल्याने हा विषय सध्या थांबविण्यात आल्याचेही पांढरे व गावडे यांनी सांगितले.

दांडीबहाद्दर 36 कर्मचाऱ्यांचा राजीनामा

संचालक मंडळ असताना दूध संघाच्या आस्थापनेवर 308 कर्मचारी होते. त्यापैकी अकार्यक्षम व संघाच्या कामावर कायम गैरहजर असलेल्या 36 कर्मचाऱ्यांनी स्वच्छेने सेवेचा राजीनामा दिला आहे. निधीची उपलब्धता झाल्यानंतर अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना कार्यान्वित केली जाणार आहे. वेतनापोटी होणारा खर्च कमी करण्याचा आमचा विचार आहे. संघाच्या व्यवहाराचे संगणकीकरण करून कमी मनुष्यबळावर अधिक काम करण्यासाठी आम्ही नियोजन करत असल्याचेही पांढरे व गावडे यांनी सांगितले.

वसुलीसाठी होणार जाहीर लिलाव

थकीत येणेबाकीच्या प्रकरणात न्यायालय हुकूमनामा प्राप्त प्रकरणात वसुलीची कारवाई प्रभावीपणे केली जात आहे. त्यासाठी वसुली अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. 159 संस्थांना वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जप्ती बोजा बसवलेल्या 147 प्रकरणातील अडीच लाखांवरील वीस थकीत प्रकरणांमध्ये वसुलीसाठी जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही पांढरे व गावडे यांनी सांगितले.

हेही वाचा: बोरगाव-घोळसगावच्या वाहत्या ओढ्याच्या पुलावरून जीवघेणा प्रवास!

कार्यकारी संचालक बडतर्फ

दूध संघातील दूध विक्री गैरव्यवहार व अपारदर्शक पद्धतीने करून संघाला 42.73 लाखांचे आर्थिक नुकसान करणे, 89.70 लाख रुपयांच्या थकीत येणेबाकीबाबत वसुलीची कायदेशीर कारवाई न करणे, कर्मचाऱ्यांना गैरवाजवी पद्धतीने 20.20 लाख ऍडव्हान्स मंजूर करणे यासह इतर कारणासाठी दूध संघाच्या तत्कालीन कार्यकारी संचालकांना सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून रक्कम वसुलीचे प्रयत्न सुरू केले असल्याची माहितीही पांढरे व गावडे यांनी दिली.

सात वर्षांनंतर सुरू झाली पशुसेवा

जिल्हा दूध संघाने 2014 पासून उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या भागातील दूध उत्पादकांसाठी सुरु असलेली पशुसेवा बंद केली होती. त्या भागातून जिल्हा दूध संघात कमी प्रमाणात दूध येत असले तरीही त्या भागातील दूध उत्पादकांना पशुसेवा देणे आवश्‍यक आहे. पशुसेवा सुरू झाल्यास निश्‍चित त्या भागात दूध उत्पादकांमध्ये संघाबद्दल विश्‍वासाचे वातावरण निर्माण होईल. या तीन तालुक्‍यात बंद असलेली पशुसेवा तब्बल सात वर्षांनंतर एक जुलै 2021 पासून सुरू केली आहे.

loading image
go to top