केंद्र सरकारच्या "स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये जिल्ह्यातील "या' नगरपालिकांना मानांकन; 571 स्पर्धकांमधून झाली निवड

Swachha Sarvekshan
Swachha Sarvekshan

मंगळवेढा (सोलापूर) : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये पाच राज्यांच्या पश्‍चिम विभागात जिल्ह्यातील मंगळवेढा व करमाळा या दोन नगरपालिकांना मानांकन मिळाले आहे. त्यात करमाळ्याला 29 वा तर मंगळवेढ्याला 30 वा क्रमांक मिळाला आहे. 

पश्‍चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा या राज्यांतील 25 हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 571 नगरपालिकांमध्ये ही स्पर्धा झाली असून, त्यामध्ये करमाळा पालिकेला 29 व मंगळवेढा पालिकेला 30 वा क्रमांक मिळाला. या योजनेमध्ये नगरपालिकेने शहरात घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया करण्याचा उपक्रम राबवला. ओल्या कचऱ्यापासून खताची निर्मिती केली. तर सुका कचऱ्याचे विलगीकरण केले. शहरामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ठेवली असून, यामध्ये नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला. लोकांच्या तक्रारींबाबत नगरपालिकेने स्वतंत्र सुविधा केली असून, यामध्ये नागरिकांना थेट ऑनलाइन तक्रार करता येत होती. त्याद्वारे त्या तक्रारींची दखल तत्काळ घेतली जाऊन तक्रारींचा निपटारा करण्यात देखील नगरपालिकेने आघाडी घेतली. 

यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण 2018-19 व इतर कामात देखील सातत्य कायम ठेवून मंगळवेढ्याचे नाव कायम ठेवले. गतवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते नगराध्यक्ष, आरोग्य सभापती, मुख्याधिकारी यांचा गौरव करण्यात आला. यंदा देशातील 141 कचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्रातील 76 शहरांत मंगळवेढ्याचा समावेश होता. सलग दोन वर्षे मंगळवेढा नगरपरिषदेने शहरातील नागरिक, विविध मंडळे व संस्थांच्या सहकार्याने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सातत्य राखल्यामुळे अडीच कोटी रुपये बक्षीस मिळाले. यामधील सव्वा कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेस प्राप्त झाला असून उर्वरित सव्वा कोटी रुपये स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये सातत्य राखल्यामुळे प्राप्त होणार आहेत. नगरपालिकेमध्ये सध्या लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये वारंवार तक्रारींमुळे नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा असताना स्वच्छ सर्वेक्षणसारख्या कामात हे सर्वजण एकजुटीने पालिकेचा गौरव वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, याचे समाधान व्यक्त होत आहे. 

याबाबत नगराध्यक्षा अरुणा माळी म्हणाल्या, सलग दोन वर्षे नियोजनबद्ध केलेले काम व कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम, सर्व नगरसेवकांचे सहकार्य आणि नागरिकांची साथ यामुळेच हा गौरव प्राप्त झाला. शहरातील स्वच्छतेची कामे व नागरिकांना चांगल्या सुविधांसाठी प्रेरणा मिळणार आहे. 

मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव म्हणाले, शहरांतील सर्व नागरीक ,पदाधिकारी,न.पा कर्मचारी, विविध संस्था, मंडळाच्या सामुहिक प्रयत्नातून यश मिळाले , शहरात कचरामुक्त, स्वच्छता व आरोग्य सुविधा या सारखा सुविधाकडे अधिक देवून नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवून शहराची प्रगती करू. 

नगरपालिकेचे आरोग्य सभापती प्रवीण खवतोडे म्हणाले, आरोग्य विभागात कायम 38 व ठेक्‍यातील 50 मनुष्यबळाच्या जोरावर स्वच्छतेकडे लक्ष दिले. शंभरपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात आवश्‍यकता असताना उपलब्ध मनुष्यबळ व नागरिकांच्या सहकार्यातून स्वच्छतेमध्ये सातत्य ठेवल्यामुळे हे मानांकन मिळाले. शहरात स्वच्छता कायम राहण्यासाठी यापुढील काळातही लक्ष दिले जाईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com