Madha: आरक्षण सोडत प्रस्थापितांना अनुकूल ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माढा नगरपंचायत

माढा : आरक्षण सोडत प्रस्थापितांना अनुकूल ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माढा : माढा नगरपंचायतीच्या आरक्षणाच्या सोडतीनंतर प्रस्थापित राजकारण्यांची सोयी झाली असून बहुतांशी प्रस्थापितांना त्यांचे प्राबल्य असलेल्या प्रभागातील आरक्षण अनुकूल ठरण्याची शक्‍यता आहे. माढा नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता. १२) दुपारी नगरपंचायतीच्या सहकारमहर्षी गणपतराव साठे सभागृहात काढण्यात आली. प्रस्थापित राजकारण्यांना आरक्षण अनुकूल ठरण्याची शक्‍यता आहे.

मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधून निवडून आलेल्या माजी नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे यांना त्यांचे होमपीच असलेल्या प्रभाग चार सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित झाल्याने प्रभाग चारमधून निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. तर माजी विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे यांचा प्रभाग क्रमांक नऊ हा पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहिल्याने त्यांना या प्रभागातून पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. माढ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे यांचे होमपीच असणारा प्रभाग क्रमांक सहा हा सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असल्याने माजी नगरसेविका संजिवनी भांगे यांना येथून पुन्हा संधी मिळू शकणार असून प्रभाग एक सर्वसाधारण झाल्याने भांगे गटाला आरक्षण अनुकूल ठरण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

प्रभाग सहामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे गट व भांगे गट अशी पारंपरिक लढतही होऊ शकते अथवा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव असलेला प्रभाग क्रमांक सात कानडे गटाला अनुकूल ठरण्याची शक्‍यता आहे. जिल्हा दूध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका अनिता चवरे यांचा प्रभाग क्रमांक अकरा हा सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असल्याने त्यांना तेथे पुन्हा संधी मिळू शकते. माजी नगरसेवक शहाजी साठे यांनाही आरक्षण अनुकूल ठरण्याची शक्‍यता आहे. माजी महिला व बालकल्याण सभापती कल्पना जगदाळे यांच्या गटाला व गटनेते सुभाष जाधव यांना मात्र सुरक्षित प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.

आदिती श्रीकांत शहाणे या विद्यार्थिनीने आरक्षण सोडतीच्या चिठ्या काढल्या. यावेळी प्रांताधिकारी ज्योती कदम, नायब तहसीलदार रविकिरण कदम, मुख्याधिकारी डॉ. चरण कोल्हे, नगर अभियंता गणेश बागल, विपुल पुजारी, पाडुरंग जोशी यांच्यासह संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, माजी नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे, माजी नगरसेवक शहाजी साठे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

माढा नगरपंचायतीचे आरक्षण

सर्वसाधारण : प्रभाग क्रमांक एक, तीन, चार, दहा. सर्वसाधारण स्त्री : प्रभाग क्रमांक सहा, आठ, अकरा, तेरा, पंधरा. अनुसूचित जाती : प्रभाग क्रमांक दोन, सोळा. अनुसूचित जाती स्त्री : प्रभाग क्रमांक बारा व सतरा. नागरिकांचा मागास प्रवर्ग : प्रभाग क्रमांक नऊ, चौदा. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री : प्रभाग क्रमांक पाच व सात.

loading image
go to top