esakal | Solapur : शरद पवारांच्या गृहप्रवेशाने कोठेंचा पक्षप्रवेश! दाराआड ठरली महापालिकेची रणनीती
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार
शरद पवारांच्या गृहप्रवेशाने कोठेंचा पक्षप्रवेश! दाराआड ठरली महापालिकेची रणनीती

पवारांच्या गृहप्रवेशाने कोठेंचा पक्षप्रवेश! ठरली महापालिकेची रणनीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गृहप्रवेशाने गेल्या वर्षभरापासूनच्या महेश कोठे (Mahesh Kothe) यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. "राधाश्री'वर खासदार पवारांनी घेतलेल्या राजकीय भोजनात महापालिका निवडणुकीची रणनीती आखली गेली. पालकमंत्री, आमदारांच्या साक्षीने शहर राष्ट्रवादीची धुरा कोठेंच्या खांद्यावर दिली. मात्र या महत्त्वाच्या प्रसंगी राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते कोठेंच्या बंद गेटवरच ताटकळत राहिले. काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्‍त करीत शरद पवारांच्या भेटीविना परत जाणे पसंत केले.

हेही वाचा: निवडणुकीपूर्वी पहिले भाषण सोलापुरातच केलं अन्‌ भाजप सरकार पडलं!

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांना आवाहन करून शरद पवार हे नगरसेवक महेश कोठे यांच्या घरी भोजनासाठी दुपारी 12.30 वाजता दाखल झाले. महेश कोठे यांनी पवार यांच्या पाहुणचाराची जंगी तयारी केली होती. पवार यांच्या आगमनापूर्वीच कोठे यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. घरामध्ये ना-ना प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्यात आले होते. तरीदेखील खासदार पवार यांनी बारामतीकरांनी केलेल्या रेसिपीचा आस्वाद घेतला. कोठे परिवाराकडून खासदार पवार यांना त्यांचीच छबी असलेल्या छापिल चादरेची अनोखी भेट त्यांना दिली.

कमी वयात नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर प्रभागाचा कायपालट केल्याबाबत देवेंद्र कोठे व परिवाराचे तोंडभरून कौतुकही याप्रसंगी खासदार पवार यांनी केले. या भोजन कार्यक्रमाप्रसंगी कोठे यांच्या निवासस्थानी महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरण बदलाबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांच्यामध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. मात्र जुन्या कार्यकर्त्यांना बाहेर थांबवून महापालिकेची रणनीती ठरल्याने अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली. दिग्गज नेत्यांची कोठेंच्या निवासस्थानी गुप्तगू सुरू असताना निवासाबाहेरील गर्दी हटविताना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. कोठे यांच्या निवासस्थानी व बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हे नेते गेटवरच ताटकळले

कोठे यांच्या निवासस्थानी खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी आतुरलेले माजी आमदार निर्मला ठोकळ, माजी महापौर मनोहर सपाटे, महेश गादेकर, शहराध्यक्षा सुनीता रोटे यांच्यासह इतर कायकर्ते गेटवरच ताटकळत थांबून होते. फोनद्वारे गेटबाहेर असल्याची कल्पना देऊनही शेवटपर्यंत कोठेंचे गेट बंदच राहिल्याने सपाटे, गादेकर, रोटे हे निवासस्थानावरून निघून गेले.

यांच्या साक्षीने घेतली सूत्रे

महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी सर्व नव्या- जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सर्व ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असे आश्‍वासन महेश कोठे यांनी पवारांना दिले. पवार यांनीदेखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, जिल्हा परिषद सदस्य बळिराम साठे, माजी आमदार राजन पाटील, कल्याणराव काळे, सुधीर खरटमल यांच्या साक्षीने राष्ट्रवादीची सूत्रे महेश कोठे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: NCPचा कॉंग्रेसला धक्‍का! माजी महापौर, माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादीत

शिवसेना अन्‌ कॉंग्रेसच्या नेत्यांची संख्या अधिक

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातावर बांधण्यासाठी शिवसेना नगरसेवक व कॉंग्रेसच्या नेत्यांची संख्या अधिक होती. कोठेंच्या निवासस्थानी खासदार पवारांची भेट घेण्यासाठी सुधीर खरटमल, नगरसेवक ऍड. यू. एन. बेरिया, माजी महापौर नलिनी चंदेले, शिवसेनेतून निवडून आलेल्या कोठेसैनिकांची संख्या अधिक होती. राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि कट्टर कार्यकर्ते हे खासदार पवार यांच्यापासून कोसो दूर होते.

बातमीदार : प्रमिला चोरगी

loading image
go to top