esakal | तब्बल 21 वर्षांनंतर मिळाले म्हैसाळ योजनेचे पाणी ! नागरिकांचा जल्लोष
sakal

बोलून बातमी शोधा

Mahisal Scheme

तब्बल 21 वर्षांनंतर मिळाले म्हैसाळ योजनेचे पाणी ! नागरिकांचा जल्लोष

sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : बहुचर्चित म्हैसाळ योजनेचे (Mhaisal Scheme) पाणी तब्बल 21 वर्षांनंतर मंगळवेढा वितरिका क्रमांक दोनच्या कालव्याद्वारे आल्याने ऐन उन्हाळ्यात मारोळी, शिरनांदगी, चिक्कलगी, जंगलगी परिसरातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे. अक्षय्य तृतीया सणाच्या मुहूर्तावर म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने नागरिकांनी एकच जल्लोष केला. (Mangalwedha taluka got water from Mhaisal scheme after 21 years)

1999 च्या विधानसभा निवडणुकीत या योजनेचा शुभारंभ झाला. सहाव्या टप्प्यातून हे पाणी मंगळवेढा शिवारातील सहा हजार हेक्‍टरसाठी सोडण्याचे प्रस्तावित होते. 1999 पासून ते 2009 पर्यंत राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते. परंतु या योजनेला 10 वर्षांत अपेक्षित गती मिळाली नाही. मतदारसंघ पुनर्रचेनंतर तत्कालीन आमदार भारत भालके यांनी या पाणी प्रश्नावर पाठपुरावा केला. दरम्यान 2014 मध्ये राज्यात व देशात राजकीय सत्तांतर झाले. या योजनेचे पाणी तालुक्‍याला मिळावे म्हणून भारत भालके विधानसभेत सातत्याने माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या सोबतीने आवाज उठवत राहिले. त्यामुळे या योजनेसाठी पंतप्रधान सिंचन योजनेतून जवळपास दोन हजारपेक्षा अधिक कोटींची तरतूद करण्यात आल्यामुळे या कामाला गती मिळाली.

हेही वाचा: खाद्यतेलाला महागाईची फोडणी ! वर्षभरात दर पोचले दुपटीवर

स्थानिक आमदार व शासन हे विरोधी असल्याने पाणी देण्याबाबत राजकीय श्रेयवाद झाल्याचा आरोप देखील झाला. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीला पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, अतिरिक्त पाणी वाहून वाया जाण्यापेक्षा हे पाणी दुष्काळी भागाला देण्यासंदर्भात शासनाने प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. हे पाणी शिरनांदगी तलावात आले. दरम्यान, एका वेळी एका वितरिकेचे काम पूर्ण झाल्यामुळे हे पाणी सध्या कालव्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे महमदाबाद, मारोळी, शिरनांदगी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर खु, सलगर बु, पौट, बावची या गावांतील 3860 हेक्‍टरपर्यंत हे पाणी चाचणीच्या निमित्ताने सोडण्यात आले. त्यामुळे भविष्यकाळात या भागातील शेतीला योजनेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या 21 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तालुक्‍याला अखेर म्हैसाळ योजनेसाठी दिवंगत आमदार भारत भालके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे व शासनाने तरतूद केलेल्या निधीमुळे या योजनेचे पाणी तालुक्‍याला मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरले आहे.

हेही वाचा: नौटंकी कशाला करता, कृतिशील सहभाग नोंदवा ! पालकमंत्री भरणेंचा भाजप लोकप्रतिनिधींना टोला

पाण्यासाठी आमच्या भागातील अनेक पिढ्या गेल्या, पण प्रत्यक्षात पाण्याचे नाव नव्हते. परंतु या भागात पाण्यासाठी बहिष्कार व विविध मार्गाने उभा केलेल्या आंदोलनामुळे व स्वर्गीय आमदार भालके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमच्या शिवारात पाणी आल्याचे पाहावयास मिळाले.

- बसवराज पाटील, आंदोलक, मारोळी

21 वर्षांपासून रखडलेला प्रश्न स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याचे समाधान लाभले. या योजनेपासून वंचित असलेल्या इतर गावांना देखील पाणी मिळवून देण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा यापुढील काळात कायम राहील.

- भगीरथ भालके, अध्यक्ष, विठ्ठल शुगर

मंगळवेढा वितरिका क्रमांक दोनची कामे पूर्ण झाल्यामुळे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे तालुक्‍यातील 9 गावांतील 3860 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- बाबासाहेब पाटील, उपविभागीय अभियंता, म्हैसाळ योजना

loading image
go to top