esakal | पाणी बॉटलच्या दरात दुधाची विक्री ! कोरोनाचा फटका, पशुखाद्याची दरवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Milk

पाणी बॉटलच्या दरात दुधाची विक्री ! कोरोनाचा फटका, पशुखाद्याची दरवाढ

sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : एकतर हाताला काम नाही, शेतात घेतलेल्या उत्पन्नाला बाजारात भाव नाही. संसाराचा गाडा हाकण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतोय, त्यात रखरखत्या कडक उन्हात दिवस- रात्र एक करून शेतकरी जनावरांसाठी काबाडकष्ट करतोय. शेतकऱ्यांसाठी आता एकमेव आशेचा किरण असलेल्या दूध उत्पादनाला देखील कोरोना महामारीचा जबर फटका बसला असून, संचारबंदीमुळे पशुखाद्याच्या किमती वाढत असताना, गाईच्या दुधाचा भाव मात्र झपाट्याने उतरल्याने एक लिटर पाण्याच्या बाटलीच्या दरात दूध विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून दूध व्यवसायाची ओळख आहे. आज ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात कमीत कमी दोन गायी असतात. या गायींच्या दुधावर त्यांचा हातखर्च व किराणा मालाचा खर्च भागतो. यामुळे अनेक शेतकरी दूध व्यवसायात उतरले आहेत. काही शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून गाई- म्हशींची खरेदी केलेली आहे. त्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणावर निवाऱ्यासाठी शेडची देखील उभारणी केलेली आहे. जनावरांसाठी अहोरात्र ते काबाडकष्ट करत असतात. या जोडधंद्यातून शेतकऱ्यांना दरवर्षी दुधाच्या कमी- जास्त भावामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. तरी देखील शेतकरी हतबल होत नसायचा, आलेल्या संकटाचा सामना करायचा. परंतु, गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले असल्याने, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभरापासून शेती मालाला पाहिजे तितका दर मिळत नाही. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची "दुष्काळात तेरावा महिना' म्हणावे तशी परिस्थिती झाली आहे.

हेही वाचा: जिल्हाधिकारी अन्‌ पोलिस आयुक्‍तांची सतर्कता ! "सिव्हिल'मधील अनेक रुग्णांचे वाचले प्राण

सध्या राज्यात केलेल्या संचारबंदीमुळे पशुखाद्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. तर दूध दरात मात्र मोठी उतराई झाली आहे. गाईच्या दुधास प्रतिलिटर 31 रुपये असलेला भाव संचारबंदीमुळे 20 ते 23 रुपये इतका झाला आहे. एकीकडे कोरोनामुळे आर्थिक संकट वाढत असताना दूध दराच्या घसरणीमुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. परिणामी नाइलाजाने शेतकऱ्यांना दुधाची विक्री प्रतिलिटर पाण्याच्या बाटलीच्या किमतीत करावी लागत आहे. त्यामुळे सरकारने आता यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी होत आहे.

जनावरांच्या खर्चाचेही दुधामध्ये भागेना

जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या वाढलेल्या किमती व चाऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल 25 रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र हेच दूध सध्या 20 ते 22 रुपये लिटरने विकले जात असल्याने, शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे जनावरांना लागणारा खुराकही लॉकडाउनमुळे वेळेवर मिळत नसल्याने, दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत असून, शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: "जनआरोग्य'ची "ती' अट जाचक ! 82 हजारांपैकी फक्त चार हजार रुग्णांनाच लाभ

सध्याच्या स्थितीत शेतीमालाचे भाव कमी झाले असून, दूध दरात देखील घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. या पडत्या काळात शासनाने शेतकऱ्यांच्या दूध दराला प्रतिलिटर तीन रुपये अनुदान द्यावे.

- शंभुराजे मोरे, संचालक, जिल्हा दूध संघ सोलापूर

राज्यात सुरू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे दूध दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. त्यामुळे दूध संकलनामध्ये मोठी घट झाली आहे.

- दादासाहेब नागटिळक, दूध संकलक, पंचरत्न उद्योग समूह, उपळाई बुद्रूक

पशुखाद्याच्या किमती वाढल्या असताना दूध दर मात्र कमी झाले आहेत. त्यामुळे जनावरे सांभाळाणे कठीण झाले आहे. सध्या बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना जनावरे विक्री देखील करता येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची चोहोबाजूने कोंडी निर्माण झाली आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- सुरेश फरतडे, दूध उत्पादक, माढा

loading image
go to top