esakal | Solapur : 'कायद्याप्रमाणे मोबदला मिळेपर्यंत प्रकल्पाचे काम होऊ देणार नाही!' माळशिरसमध्ये प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

माळशिरसमध्ये प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

माळशिरस परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 4) अहिल्यादेवी होळकर चौकाज रास्ता रोको आंदोलन केले.

'कायद्याप्रमाणे मोबदला मिळेपर्यंत प्रकल्पाचे काम होऊ देणार नाही!'

sakal_logo
By
गहिनीनाथ वाघंबरे

माळशिरस (सोलापूर) : माळशिरस (Malshiras) नगरपंचायत हद्दीमधील क्षेत्रातील जमिनीला ग्रामपंचायत क्षेत्रापेक्षा कमी बाजारभावाने कवडीमोल मोबदला दिला आहे. भूसंपादन कायदा 2013चे उल्लंघन करून चुकीचा निवाडा मंजूर केला आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रशासनाने केलेल्या अन्यायाच्या विरोधात 2019 मध्ये अपिलात गेले आहेत. परंतु त्या अपिलाचा आजतागायत निकाल दिला गेला नाही. याउलट पंढरपूर (Pandharpur) तालुक्‍यातील याच संदर्भात दाखल केलेल्या लवादाचा निकाल 4 जून 2021 रोजी दिला आहे. परंतु माळशिरसमधील प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली तीन वर्षे न्यायासाठी शासन दरबारी दाद मागत आहेत. यापूर्वी अनेक वेळा रास्ता रोको व मोर्चे (Agitation) यांचा अवलंब करून आपले म्हणणे शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तरी न्याय मिळत नाही, म्हणून माळशिरस परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 4) अहिल्यादेवी होळकर चौकाज रास्ता रोको आंदोलन केले.

हेही वाचा: घरफोडीतील आरोपीचा पोलिस कोठडीत मृत्यू! CID करणार सखोल तपास

या वेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, की भूसंपादन करणारे अधिकारी दुजाभाव करून शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारमधील रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भूसंपादन कायद्यात 80 ते 90 टक्के भूसंपादन मोबदला शेतकऱ्यांनी स्वखुशीने स्वीकारल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करता येत नाही, असा खुलासा पत्रकार परिषदेत केला आहे. तरी, माळशिरस नगरपंचायत हद्दीत 80 टक्के भूसंपादन झाले नसताना फक्त 20 टक्के शेतकऱ्यांच्या बॅंकेच्या खात्यावर भूसंपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, लवादात अपिल दाखल करा मग वाढीव मोबदला मिळेल, असे तोंडी आश्वासन देऊन 20 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर भूसंपादन मोबदला जमा केला आहे. अज्ञानामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.

हेही वाचा: यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे : पंचांगकर्ते मोहन दाते

जोपर्यंत भूसंपादन व पुनर्वसन कायदा 2013 प्रमाणे मोबदला मिळत नाही, तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू करू दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे निवेदन तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी स्वीकारले. या मोर्चात सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा सहभाग होता. निवेदनावर ऍड. सोमनाथ वाघमोडे, ऍड. प्रभाकर कुलकर्णी, अमोल यादव, नितीन वाघमोडे, सागर ढवळे, अजिनाथ टेळे, आबासाहेब कोळेकर यांच्या सह्या आहेत. बाळासाहेब सरगर, सुरेश टेळे, श्‍यामराव बंडगर, अप्पासाहेब कर्चे, अजित बोरकर, रणजित सूळ, सोमनाथ पिसे, माणिकराव जगताप, किशोर सूळ यांच्यासह महिलांनीही या मोर्चास उपस्थित राहून पाठिंबा दिला. पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोर्चा शांततेत पार पडण्यासाठी परिश्रम घेतले. कलम 68/69 नुसार मोर्चातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून थोड्या वेळानंतर सोडून दिले.

loading image
go to top