चारित्र्याच्या संशयातून गर्भवती पत्नीचा खून! पतीला न्यायालयाने ठोठावली जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court
चारित्र्याच्या संशयातून गर्भवती पत्नीचा खून! पतीला न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

चारित्र्याच्या संशयातून गर्भवती पत्नीचा खून! पतीला न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

सोलापूर : चारित्र्यावर संशय घेऊन गर्भवती पत्नीचा गळा आवळून तिला जीवे ठार मारल्याप्रकरणी पती हणमंतु चणप्पा गोटे (रा. जेऊर, ता. अक्कलकोट) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

घटनेची हकीकत अशी, रेणुका यांचा विवाह २०१२ मध्ये जेऊर येथील हणमंतु गोटे याच्याशी झाला. व्यवसायाने तो वाहनचालक होता. विवाहानंतर काही महिन्यांनी तो रेणुकाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्याच्या सततच्या भांडणाला वैतागून रेणुका दोन मुलांना घेऊन रविवार पेठेतील मामा आनंद साळुंखे यांच्याकडे आली होती. २०१९ मध्ये हणमंतु हा रेणुकाला घेऊन जेऊरला गेला. पाच महिन्यांनी पुन्हा तो मारहाण करू लागला. त्यावेळी ती गर्भवती होती. त्याच्या त्रासामुळे रेणुका पुन्हा मामाकडे आली. मार्च २०२० मध्ये लॉकडाउन सुरु झाल्यावर हणमंतु सोलापुरात आला आणि आता चांगले वागतो, पुन्हा मारहाण, भांडण करीत नाही म्हणून रेणुकाला घेऊन गेला. रेणुकाच्या बहिणी तिला दररोज कॉल करून खुशाली विचारत होत्या. ८ जुलै २०२० रोजी रेणुकाची बहीण रेखा नागनाथ चौगुले हिला सुटी होती म्हणून ती मोठी बहीण सुजाताकडे गेली होती. त्यावेळी दुपारी १२ वाजता रेणुकाचा कॉल आला आणि हणमंतु मारहाण करीत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर रेखाला आईनेही कॉल करून मारहाणीबद्दल सांगितले. त्यानंतर दोघी बहिणी रिक्षा करून रेणुकाकडे गेल्या. घराबाहेर जाऊन रेणुकाला हाक मारली. पण, घरातून काही आवाज येत नसल्याने रेणुकाचा मुलगा सुनिलला बोलावण्यास सांगितले. तो घरात गेला, त्यावेळी रेणुका जमिनीवर निपचित पडली होती. रेखा व सुजाताने घरात जाऊन पाहिले, त्यावेळी रेणुकाचे शरीर थंड पडले होते आणि हणमंतु घरातून निघून गेला होता. रेणुकाच्या गळ्याला साडी गुंडळालेली होती आणि गळ्यावर व्रण होते. रेखा यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली आणि हणमंतुला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात १४ साक्षीदार तपासले. न्यायालयाने हणमंतुला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि पाच हजारांचा दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावली.

चिमुकला ठरला महत्त्वाचा साक्षीदार
मयत रेणुकाच्या लहान मुलाने वडिलांविरूध्द साक्ष दिली. त्याचा जबाब महत्वाचा ठरला. आरोपी हणमंतु चनप्पा गोटे हा पत्नीला सातत्याने शिवीगाळ व मारहाण करीत होता. घटनेच्या दिवशी नेमके काय घडले, याचा उलगडा त्या चिमुकल्याने केला. वैद्यकीय पुरावा, परिस्थितीजन्य पुरावा, घटनास्थळावरील पंचनामा, फिर्यादीचा व मयत रेणुकाच्या लहान मुलाचा जबाब आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद, या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होण्यासाठी महत्त्वाचा ठरला. जिल्हा सरकारी वकिल ॲड. प्रदिपसिंग राजपूत यांच्या कार्यकाळातील ही ८१ वी शिक्षा ठरली.