esakal | Solapur : 'पशू आधार कार्ड'! मोहोळ तालुक्‍यातील 80 हजार जनावरांना मिळाली ओळख
sakal

बोलून बातमी शोधा

'पशू आधार कार्ड'!

आता जनावरांचेही 'पशू आधार कार्ड' तयार झाले असून, मोहोळ तालुक्‍यातील 80 हजार जनावरांच्या कानांना आधार कार्डसाठी बिल्ले मारण्यात आले आहेत.

'पशू आधार कार्ड'! मोहोळ तालुक्‍यातील 80 हजार जनावरांना मिळाली ओळख

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : सध्या माणसाची सर्वत्र ओळख ही आधार कार्ड (Aadhar Card) आहे. प्रत्येक ठिकाणी, विविध शासकीय कार्यालये, तसेच वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता जनावरांचेही 'पशू आधार कार्ड' तयार झाले असून, मोहोळ तालुक्‍यातील 80 हजार जनावरांच्या कानांना आधार कार्डसाठी बिल्ले मारण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप रणवरे (Dr. Pradeep Ranaware) यांनी दिली.

हेही वाचा: अमेरिकेतून 'हे' आले कसे? उजनी जलाशयात आढळले 'रेड इअर स्लाईडर'!

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सध्या सर्वत्र ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय करतात. गेल्या सुमारे पाच वर्षात व त्या अगोदरही शेतकऱ्यांवर अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. त्यात अतिवृष्टी हे मुख्य संकट आहे. 2020 च्या अतिवृष्टीत मोहोळ तालुक्‍यातील सुमारे नऊशे जनावरे मृत्युमुखी पडली. त्यांची नुकसान भरपाई कशी द्यावी, याची मोठी अडचण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. जनावरांच्या आधार कार्डची योजना ही केंद्र शासनाची असून, हे आधार कार्ड केंद्र सरकारच्या "इनाफ' या संगणक प्रणालीवर नोंदवली गेले आहेत.

बिल्ला असेल तरच मिळणार शासकीय लाभ

या आधार कार्डसाठी जनावरांच्या कानाला बारा अंक असलेला प्लास्टिकचा पिवळा बिल्ला मारण्यात आला आहे. हा बारा अंकी नंबर संगणकावर टाकल्यास जनावराच्या मालकाचे नाव, गाव व जनावराचे वय समजणार आहे. याला बारकोडही आहे. मोहोळ तालुक्‍यात मोठी 98 हजार जनावरे असून 58 हजार शेळ्या-मेंढ्या आहेत. या सर्वांच्या कानाला बिले मारण्यात येणार आहेत. केंद्र शासनाकडून एकूण 91 हजार बिल्ले प्राप्त झाले होते. सध्या अंगावर वीज पडून जनावरे दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. जनावर दगावल्यास त्याचे शवविच्छेदन व पंचनामा करून कशीबशी शासकीय मदत मिळते. मात्र, भविष्यात जनावराच्या कानाला बिल्ला नसेल तर कुठलाच लाभ मिळणार नाही, लसीकरण होणार नाही, मदतही मिळणार नाही, तसेच विमाही उतरविता येणार नाही. शासनाने विमा प्रतिनिधींनाही याबाबत पत्र दिले असून, बिल्ला असेल तरच विमा उतरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मोहोळ तालुक्‍याची पशुधन स्थिती...

  • गाय एकूण संख्या : 61 हजार 147

  • म्हशी : 36 हजार 545

  • शेळी : 51 हजार 517

  • मेंढी : 6 हजार 318

हेही वाचा: नियमबाह्य कर्ज वाटपप्रकरणी बॅंकेचे अधिकारी गोत्यात! चौकशीचे आदेश

कानाला जखम होते म्हणून अनेक शेतकरी बिल्ले मारून घेत नाहीत. जखम फार दिवस राहात नाही, मात्र आपत्ती काळात जनावर दगावल्यास व बिल्ला नसल्यास त्याची कोणीही दखल घेणार नाही, त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी जनावराच्या कानाला बिल्ले मारून घ्यावेत.

- डॉ. प्रदीप रणवरे, पशुधन विकास अधिकारी, मोहोळ

loading image
go to top