70 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण; संघटनांचे मत आकडेवारी चुकीची 

online education
online education

सोलापूर : कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यभर मागील जवळपास दीड-दोन महिन्यांपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 15 मार्चपासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या कारणाने शिक्षण विभागाने शाळा बंद शिक्षण सुरू असा उपक्रम सुरू केला आहे. ऑनलाइन असलेल्या या उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केला आहे. मात्र, हा दावा धादांत खोटा असल्याचे मत संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. 

विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षणासाठी उपक्रम 
शाळा बंद असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शाळा बंद शिक्षण सुरू हा नवीन उपक्रम राज्याच्या शिक्षण विभागाने सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पालकांकडे असलेल्या अँड्रॉइड मोबाईल फोनचा वापर करून विद्यार्थ्यांना घर बसल्या शिक्षण देण्याची पद्धत या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू झाली आहे. या उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्याचा दावा जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केला आहे. मात्र, हा दावा प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी खोडून काढला आहे. 

हा उपक्रम स्थगित करण्याची मागणी 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड फोन उपलब्ध नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्‍य होत नसल्याचे मत संघटनांनी व्यक्त केले. त्याचबरोबर अनेक शिक्षकांनीही या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला नसल्याची माहिती आहे. शिक्षकांच्या व्यवसायावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा हा काळ असल्याने शाळा बंद शिक्षण सुरू हा उपक्रम स्थगित करण्याची मागणीही काही संघटनांनी केली. 

जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद 
सोलापूर जिल्ह्यात दोन हजार 799 प्राथमिक शाळा आहेत. या प्राथमिक शाळांवर नऊ हजार 951 प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांमध्ये दोन लाख सात हजार 123 एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लॉकडाउनच्या काळात या दोन लाख सात हजार 128 विद्यार्थ्यांपैकी एक लाख 43 हजार 454 एवढ्या विद्यार्थ्यांनी शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमात सहभाग घेतल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. दोन हजार 799 शाळांपैकी दोन हजार 389 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. नऊ हजार 951 शिक्षकांपैकी या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांची संख्या आठ हजार 462 एवढी असल्याचेही शिक्षण विभागाने म्हटले आहे. 

केंद्र स्तरावरून वरिष्ठ कार्यालयाला वर्क फ्रॉम होमची जी आकडेवारी दिली जाते ती चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमाला स्थगिती देण्याची मागणी आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. 
- म. ज. मोरे, 
जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ 

ग्रामीण भागातील वाडी, वस्तीचा विचार केला तर अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत. काही पालकाकडे आहेत ते पालक मुलांना मोबाईल देत नाहीत. बालवयात मोबाईल मुलांना हाताळण्यास देण्यास योग्य नाही. असेल तर त्याला नेट पॅक गोरगरिबांना परवडतो का? असे एक ना प्रश्‍न आहेत. परंतु, सरसकट सर्वांना एकाच मापात घेऊ लागलो आणि सक्ती केली तर यावर नक्की वेगळा विचार करावा लागेल. यावर विचार करणार कोण? समजा एखादा करूच लागला तर त्यावर नक्की क्रिया प्रतिक्रिया उमटणार त्याबद्दल दुमत नाही. ग्रामीण भागात परिस्थिती नक्की वेगळी, त्यातच मुलांचे खेळण्या बागडण्याच वय त्यातंच त्यातच त्याला या लहान वयात मोबाईल हाताळायला देणे कितपत योग्य. 
- लिंबराज जाधव, 
कार्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ 

दरवर्षीची सुटी व यावर्षीची सुटी वेगवेगळी आहे. या सुटीत विद्यार्थ्यांना कुठेही बाहेरगावी जायला मिळणार नाही. त्यामुळे या संधीचा शिक्षकांनी सदुपयोग करून घेतला पाहिजे. ज्यांना जमत आहे त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भविष्यात ऑनलाइन शिक्षणावरच भर दिला जाणार आहे. त्या दृष्टीने पुढील वर्षाचे ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्‍याचं तयार करण्यात आलेले आहे. 
- संजयकुमार राठोड, 
शिक्षणाधिकारी, प्राथमिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com