esakal | पोलिसच वैतागले हातभट्टी दारू व्यावसायिकांना ! पोलिस अधीक्षक सातपुतेंचे 'ऑपरेशन परिवर्तन'
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसच वैतागले हातभट्टी दारू व्यावसायिकांना ! पोलिस अधीक्षक सातपुतेंचे ऑपरेशन परिवर्तन

वारंवार पोलिसांनी कारवाई करूनही काही दिवसांनी त्याच परिसरात हातभट्ट्या दिसतात.

पोलिसच वैतागले हातभट्टी दारू व्यावसायिकांना !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर (Solapur) ग्रामीणमध्ये हातभट्टी दारू गाळण्याच्या गुन्ह्यात (Crime) मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी (Police) कारवाई करूनही ते व्यावसायिक कारवाईला जुमानत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विशेषत: मुळेगाव तांडा (Mulegaon Tanda) या ठिकाणी गावठी हातभट्टी दारूची निर्मिती होते. वारंवार पोलिसांनी कारवाई करूनही काही दिवसांनी त्याच परिसरात हातभट्ट्या दिसतात. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute) यांनी "ऑपरेशन परिवर्तन' सुरू केले आहे.

हेही वाचा: चिमुकलीच्या 'त्या' उत्तराने समोर आले ऑनलाइन शिक्षणाचे वास्तव !

जुलै 2019 पर्यंत हातभट्टी दारू गाळण्याचे एक हजार 498 गुन्हे दाखल झाले होते. तर जुलै 2020 पर्यंत एक हजार 722 गुन्हे दाखल झाले होते. मात्र, यंदा जुलै 2021 पर्यंत तब्बल दोन हजार 459 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करूनही अटक गुन्हेगारांना जामीन मिळतो व त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही, असे निरीक्षण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नोंदविले आहे. हातभट्टी दारूच्या केसमध्ये कलम 328 दाखल होत नसल्याने त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. हातभट्टी दारू प्रकरणात शिक्षा लागलेल्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे वैतागलेल्या पोलिस विभागाने आता अशा लोकांना त्या व्यवसायापासून परावृत्त करून त्यांच्या पुढील पिढीला योग्य दिशा दाखविण्याच्या हेतूने "ऑपरेशन परिवर्तन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हातभट्टी तयार होणाऱ्या ठिकाणांची यादी संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली असून, त्यानुसार ते कार्यवाही करतील, असेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा: शोध मोहिमेत सापडला पंढरपूर तालुक्‍यात बोगस डॉक्‍टर! गुन्हा दाखल

"ऑपरेशन परिवर्तन'चा उद्देश...

  • हातभट्टी दारू तयार होणाऱ्या ठिकाणांना संबंधित अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोनदा भेट द्यावी

  • अवैध हातभट्ट्या, रसायन अथवा दारू मिळून आल्यास संबंधितावर तत्काळ कारवाई करावी

  • हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांना त्या व्यवसायापासून परावृत्त करावे; त्यांच्याशी वारंवार संपर्क करून मार्गदर्शन करावे

  • कायदेशीर, सन्मानजनक व्यवसायासाठी लागणारे कर्ज, शासकीय मदतीची माहिती त्यांना गाव अथवा पोलिस ठाण्यात द्यावी

  • परावृत्त व्यक्‍तीच्या कुटुंबातील तरुण मुलगा पुन्हा त्याच वाटेवर जाऊ नये म्हणून त्याला करिअर मार्गदर्शन करावे

  • संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा महिन्यात एकदा घेण्यात येईल

loading image
go to top