Pandharpur News : पंढरीतील उद्यानांची देखभाली अभावी दुरवस्था

पंढरपूर नगरपालिकेने तातडीने या उद्यानांची दुरुस्ती करावी अशी मागणी समस्त पंढरपुरांकडून होत आहे.
Pandharpur News
Pandharpur News sakal

पंढरपूर : तुटलेल्या खेळण्यांचे शिल्लक राहिलेले सांगाडे.. मिनी ट्रेन गायब उरले फक्त रेल्वेचे रुळ..उन्हात करपलेले गवताचे लॉन.. सुकलेले असंख्य शोभिवंत वृक्ष..बंद पडलेले कारंजे.. भंगार झालेली लोखंडी आसने.. अशी दुरवस्था झाली आहे पंढरीतील जिजामाता व पद्मावती उद्यानाची! कोण एकेकाळी पंढरीच्या वैभवात भर घालणारी ही दोन्ही उद्याने सध्या भकास झाल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. पंढरपूर नगरपालिकेने तातडीने या उद्यानांची दुरुस्ती करावी अशी मागणी समस्त पंढरपुरांकडून होत आहे.

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लोकसंख्या सुमारे दोन ते अडीच लाखाच्या आसपास गेली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा समावेश असलेल्या पंढरपूर नगरपालिका हद्दीतील नागरिकांना विरंगुळ्यासाठी, तर बच्चे कंपनीला खेळण्यासाठी पालिकेचे एकही उद्यान सध्या सुस्थितीत नाही. शहरातील शिवाजी चौक परिसरात असलेल्या जिजामाता व पद्मावती ही उद्याने कोणे एकेकाळी नागरिकांच्या आवडीचे रमणीय पर्यटन स्थळ होती.

या उद्यानामध्ये पूर्वी विविध रंगी गुलाबांची बाग होती, गर्द वृक्षांची दाटी होती, घसरगुंडी, झोपाळे, पाळणा, सिसॉ, भुलभुलय्या अशी खेळणी होती, रंगीबेरंगी पाण्याचे तुषार उडवणारे कारंजी होती, त्यामुळे ही दोन्ही उद्याने पंढरपूरचे वैभव होती. जिजामाता उद्यानाच्या गवताच्या लॉन मध्ये मध्ये तर राज्यातील सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक व विचारवंतांची व्याख्याने होत असत. या व्याख्यानांना सृजनशील पंढरपूरकर रसिकांची मोठी गर्दी होत असे.

मात्र सध्या या लॉन मधील गवत पूर्णपणे जळून गेले आहे. तर छोटेखानी काँक्रीटच्या व्यासपीठाला भेगा पडल्या आहेत. विशेष बाब म्हणजे महिलांच्या बागेचा (डोहाळे जेवणाचा) कार्यक्रम देखील जिजामाता उद्यानात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असे. तर दोन्ही बागांमध्ये असलेल्या मिनी ट्रेन मधून प्रवास करण्यासाठी बच्चे कंपनीची अक्षरशः झुंबड उडालेली असे. मात्र कालांतराने पालिकेच्या देखभाल व दुरुस्ती अभावी या उद्यानांची मागील काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. दोन्ही उद्यानांमधील खेळण्याचे साहित्य ऊन पावसात गंजून भंगार झाले आहे.

मिनी ट्रेन तर दृष्टीस पडत नसून त्या ट्रेनचे फक्त रेल्वे रुळ शिल्लक राहिले आहेत. शोभिवंत झाडे जळाल्याने उद्यान रखरखीत झाले आहे. एकंदरीतच ही दोन्ही उद्याने भकास झाल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड झाला असून उदास झाली आहेत. पुढील महिन्यात वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्ट्या सुरू होतील. त्यामुळे पालिकेने तातडीने या दोन्ही बागांची दुरुस्ती करून बालगोपाळांना उन्हाळी सुट्टीत खेळण्यासाठी उद्याने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Pandharpur News
Solapur News : ग्रामीण पोलिसांकडून १३ लाखांची हातभट्टीची दारू नष्ट

पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने जिजामाता व पद्मावती उद्यान नव्याने विकसित करण्यात येणार आहेत. या दोन्ही उद्यानातील विकास कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली असून कामाला सुरुवात देखील झाली आहे. उद्यानात होणारी विकास कामे दर्जेदार व्हावीत याची दक्षता घेण्यात येत असून उद्यान लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. - *डॉ.प्रशांत जाधव, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com