esakal | "आमच्या पोलिस बाबांना सहकार्य करा, रस्त्यावर उगाच फिरू नका !'
sakal

बोलून बातमी शोधा

Police

"आमच्या पोलिस बाबांना सहकार्य करा, रस्त्यावर उगाच फिरू नका !'

sakal_logo
By
रमेश दास

वाळूज (सोलापूर) : पोलिसांच्या चिमुकल्यां मुलांनी नागरिकांना केलेले "पोलिसांना सहकार्य करा, घरीच राहा, जय हिंद..!' हे भावनिक आवाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. "आम्ही पोलिसांची मुले आव्हान करतो की, पोलिसांना सहकार्य करा, घरीच राहा, जय हिंद..!' अशी रंगीबेरंगी अक्षरपाटी हातात घेऊन कोव्हिड वॉरियर्स म्हणून आपला जीव धोक्‍यात घालून रात्रंदिवस सर्व स्तरावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांच्या पोटच्या गोळ्यांनी "आमच्या पोलिस बाबांना सहकार्य करा, रस्त्यावर उगीच फिरू नका' हे सांगण्यासाठी फोटो चेनद्वारे हा संदेश दिला आहे. हा संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

"सोलापूर ग्रामीण पोलिस' या फेसबुक पेजवर सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अतुल झेंडे यांनी "प्लीज स्टे होम, स्टे सेफ, सपोर्ट कोव्हिड वॉरियर्स' असे आवाहन केले आहे. या पेजवरून पोलिसांच्या चिमुकल्या निरागस लेकरांनीही, लॉकडाऊनमध्येही रस्त्यावर मोकाट फिरू नका म्हणून दिलेल्या भावनिक बोबड्या आवाहनाला सोशल मीडियावरील सपोर्टरकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा: डॉक्‍टरचा दिलदारपणा ! उद्‌घाटनापूर्वीच दिले हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी

राज्यात आणि देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पोलिस सर्व आघाड्यांवर सतत बजावत असतात. दहशतवादी हल्ले, राजकीय कार्यक्रम, धार्मिक गर्दीचे कार्यक्रम जसे विविध उत्सव, जत्रा, यात्रा, कुंभमेळे, दंगली, चोऱ्या-दरोडे, अपघात, विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती, संचारबंदी, टाळेबंदी, नाकाबंदी यांसारख्या कर्तव्यावर ते सतत मानसिक तणावात असतात. त्यांचेही कुटुंब आहे. त्यांनासुद्धा आपल्यासारखे आई, वडील, नातेवाईक, पत्नी, छोटी छोटी गोंडस मुलं- मुली आहेत. त्यांना त्यांच्यासाठी वेळ देता येत नाही. ही बाबा म्हणणारी गोंडस चिमुकली बाबांची वाट पाहून रोज झोपते, तेव्हा बाबा रात्री- अपरात्री एक- दोन वाजता येतो आणि लेकरांना झोपेतच गोंजारून सकाळी ते उठायच्या आत ड्यूटीवर जातो. बाळ उठून बाबाला पाहू शकत नाही. त्याला लाडाने त्याच्या कुशीत शिरून दोन पापे घ्यावे वाटतात, पण ते सुख या धावपळीत त्यांच्यापासून कायमचं हिरावतं. कधी कधी कामावर जाताना त्यांच्या हाताला व पायाला धरून "बाबा, लवकर घरी या, आम्ही वाट पाहतो' ही हाक काळीज चिरून जाते.

सोलापूर जिल्ह्यासह राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. तरी पण काही लोक रस्त्यांवर बिनकामाचे फिरत आहेत. काहीजण विनामास्क फिरत आहेत. नियमांचे पालन न करता इतरांचे आयुष्य धोक्‍यात घालत आहेत. पोलिसांनी हटकले तर त्यांच्याशीच वाद घालून उलट शिव्या, झटापट करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नागरिकांनी कोव्हिड विषाणूचा झपाट्याने होत असलेली संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने व पोलिसांच्या पोटच्या गोळ्यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद द्यावा, अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

हेही वाचा: आता आवाहन, सूचना, इशारा बंद ! थेट ग्रामपंचायत करातून होणार दंडाची वसुली

नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामासाठी, अत्यावश्‍यक सेवेसाठीच घराबाहेर पडावे. रस्त्यावर उगीच मोकाट फिरू नये. स्वतःची, कुटुंबाची व समाजाची या जीवघेण्या संसर्गापासून काळजी घ्यावी. नियमांचे पालन करा. पोलिसांना सहकार्य करा.

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

loading image