esakal | ...तर 'या' कारखान्यात बारा दिवसांत सुरु होईल ऑक्सिजन निर्मिती

बोलून बातमी शोधा

oxygen production

श्री.पाटील म्हणाले, देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी महाभयंकर लाट आली आहे. ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून ऑक्सिजन अभावी कोरोनाबाधित रुग्णांचे जीव धोक्यात येत आहेत.

...तर 'या' कारखान्यात बारा दिवसांत सुरु होईल ऑक्सिजन निर्मिती
sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : धाराशीव साखर कारखाना, चोराखळी ( जि.उस्मानाबाद ) मध्ये ऑक्सिजन निमर्तीचा महाराष्ट्रातील पायलट प्रोजेक्ट उभा करण्याचा निर्णय झाला आहे. या प्रयत्नाला यश मिळाले तर येत्या दहा, बारा दिवसात आपल्या या कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती सुरु होईल, अशी माहिती धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.

श्री.पाटील म्हणाले, देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी महाभयंकर लाट आली आहे. ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून ऑक्सिजन अभावी कोरोनाबाधित रुग्णांचे जीव धोक्यात येत आहेत. सध्याची ही परिस्थिती लक्षात घेऊन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करावेत अशा सूचना केल्या होत्या. त्याची दखल घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संजय पाटील, मौज इंजिनिअरिंगचे श्री.ओक तसेच राज्यातील प्रमुख साखर कारखान्यांच्या पदाधिकारी यांचे समवेत झूम मिटींग घेतली.

हेही वाचा: बार्शीकरांनो, कोरोनाची साखळी तोडा : पालकमंत्री भरणे

साखर कारखान्यातील इथेनाॅल निर्मिती प्रकल्पात ज्यावेळी कार्बनडाय ऑक्साईड आणि नायट्रोजन बाजूला काढला जातो तेंव्हा ऑक्सिजन शिल्लक रहातो. मॉलिक्युलर सिव्ह वापरून तो ऑक्सिजन जमा करुन तो कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी देता येणे शक्य असल्याचे अभिजित पाटील यांनी तपशीलवार सांगितले. त्यानुसार आपल्या धाराशीव साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करण्याचा महाराष्ट्रातील पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी या संदर्भात आवश्यक परवानग्या त्वरित देण्यास सांगून हा प्रोजेक्ट लवकर उभा करण्याच्या सूचना केल्या.

पायलट प्रोजेक्ट साठी आवश्यक असलेली इक्वीपमेंट आणि मटेरियल ची ऑर्डर तातडीने देण्यात आली असून येत्या चार, पाच दिवसात ते चोराखळी येथे कारखान्यावर पोचेल. त्यापुढील चार, पाच दिवसात यंत्रणा उभा राहील आणि आवश्यक ट्रायल झाल्यानंतर पुढील चार दिवसात प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती सुरु होईल. दिवसभरात तिथे 15 ते 20 टन ऑक्सिजनची निर्मिती होईल. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला तर आगामी काळात महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती सुरु होईल आणि कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळून अनेक रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी मोठी मदत होईल.

हेही वाचा: उजनीचा पाणीसाठा आला 20 टक्‍क्‍यांवर

ऑक्सिजन निर्मितीच्या या प्रयत्नाला श्री विठ्ठलाच्या आर्शिवादाने यश मिळेल.

शेतकऱ्यांनी उभे केलेले साखऱ कारखाने सध्याच्या संकटकाळात लोकांच्या मदतीसाठी उभे राहून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल, असा विश्वास अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.