Salapur : भोसे पाणी योजना सुरू होण्याबाबत पाणीपुरवठा मंत्र्याचे गुळमळीत उत्तर Salapur Bhose Pani Yojana Water Supply Minister | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसे पाणी योजना

Salapur : भोसे पाणी योजना सुरू होण्याबाबत पाणीपुरवठा मंत्र्याचे गुळमळीत उत्तर

मंगळवेढा : दक्षिण भागातील 39 गावाची तहान भागवणाऱ्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात आ. आवताडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या गुळमळीत उत्तरामुळे बंद पाणी योजना सुरू होण्याबाबत शाशंकता निर्माण झाल्यामुळे दक्षिण भागातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या बहिष्कारा नंतर तालुक्याचा पाणी प्रश्न चव्हाट्यावर आल्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लोक वर्गणीची अट रद्द करून स्व. आ.भालके यांनी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ७१ कोटीचा निधी खर्चून कार्यान्वित केली. मात्र गेली दोन वर्षापासून बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

39 गावाची पाणीपट्टीच्या रूपाने येणे बाकी असलेली रक्कम ही जवळपास 40 लाखाच्या आसपास आहे व विज बिल 1 कोटी 17 लाख इतकी आहे. तपावतीमध्ये असणारी 67 लाखाची रक्कम कोण भरणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करत असताना वीज बिलाच्या फरकातील रक्कम कोण भरणार यावर तोडगा न करता ती योजना हस्तांतरित करण्यात आली.

पंचायतराज पाहणीच्या दौऱ्यात देखील आ. समाधान आवताडे यांनी या योजनेबाबत तक्रार केली. मात्र त्याही कडे दुर्लक्ष केले.अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आ.आवताडे यांनी पुन्हा लक्षवेधी द्वारे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीज बिल शासन माफ करणार का ? 40 गावाला टँकरने पाणीपुरवठा करणार का ? वीज बिलाला पर्याय म्हणून सौर ऊर्जा वापरून वीज पुरवठा सुरळीत करणार का ? व या सदर योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करणार का ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते

यावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की सदर योजनेचे योजनेचे पाणी सुरू करण्यासाठी विज बिल भरणे आवश्यक असून वीज बिलाचे टप्पे करून देण्याबाबत ऊर्जा मंत्राला विनंती करू तसेच 11 गावाला पाणी पोहोचले नसलेल्या प्रकरणाची चौकशी देखील करू व सोलर द्वारे वीज पुरवठा करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले शिवाय ज्या ग्रामपंचायतीकडे विज बिल पाणीपट्टी थकले आहेत

त्यांनी त्यांच्या थकबाकीतील 5 टक्के 10 टक्के रक्कम भरण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून या योजनेचे पाणी सुरू करण्यात येईल असे आश्वासन देताना तपावतील 67 लाखाचे विज बिल कोण भरणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत ठेवल्यामुळे ही योजना सुरू होण्याबाबतचा प्रश्नचिन्ह कायम राहिला.

दोन महिन्यापूर्वी पौट,सोड्डी, सलगर खुर्द,शिरनांदगी,हाजापूर, पाटकळ, गोणेवाडी,मारोळी,येड्राव, या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या ग्रामपंचायतीवरील सत्तेसाठी सत्ताधारी आणि विरोधी गटाने जवळपास कोट्यावधी रुपयाची उलाढाल केली.

मात्र काही हजारात असलेली पाणीपट्टी भरण्यासाठी मात्र चालढकल करत गावाचे नाव थकबाकीच्या यादीत ठेवले मात्र गावाला शुद्ध पाणी देण्यासाठी गावावर असलेली थकबाकी भरण्यासाठी पुढाकार घेताना मात्र कोणी समोर आले नाही