Abhijeet Patil : अभिजित पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष ; तातडीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय अभिजित पाटील यांची विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्याने आर्थिक नाकेबंदी झाली आहे.
Abhijeet Patil
Abhijeet Patilsakal

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय अभिजित पाटील यांची विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्याने आर्थिक नाकेबंदी झाली आहे. प्रयत्न करूनही त्यातून मार्ग निघत नसल्याने अखेर अभिजित पाटील यांनी शुक्रवारी रात्री कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची संस्था असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांच्यासमोर मांडली आहे. त्यामुळे आता अभिजित पाटीलच यासंदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे, अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे अभिजित पाटील यांनी सांगितले.

शुक्रवारी (ता. २६) विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केली आहे. त्यानंतर आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची कारखाना कार्यस्थळावर बैठक झाली या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपण घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी भूमिका मांडली. त्यानंतर आता अभिजित पाटील भाजपत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगोला, माढा आणि अकलूजच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Abhijeet Patil
Solapur Lok Sabha Election : सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला; प्रणिती शिंदेंचा भाजपला सवाल

शरद पवार यांच्यासोबत अभिजित पाटील हे करमाळ्यातील सभेत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बॅंकेने शुक्रवारी जप्तीची कारवाई केली आहे. बॅंकेने विठ्ठल कारखान्याची तीन गोदामेही सील केली आहेत. त्या गोदामात तब्बल ३९ कोटी रूपयांची साखर सील केली आहे. विठ्ठल साखर कारखान्याकडे राज्य सहकारी बॅंकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण ४३० कोटी रुपये थकीत आहेत.

या प्रकरणी पुणे येथील डीआरटी न्यायालयात सुनावणी सुरू होती. डीआरटी न्यायालयाने सुनावणीत कारवाईला दिलेली स्थगिती उठवली आणि राज्य सहकारी बॅंकेने विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. दरम्यान, जप्तीच्या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी शुक्रवारी रात्री संचालक मंडळ आणि विश्वासू सहकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ‘कुठलाही निर्णय घ्या; पण विठ्ठल कारखाना वाचावा’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.

अजून अंतिम निर्णय नाही : अभिजित पाटील

यासंदर्भात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, राज्य सहकारी बॅंकेच्या जप्तीनंतर पुढे काय निर्णय घ्यायचा, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला दिले आहे. मात्र, अजून मी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com