Solapur: शहरात दरवर्षी गुन्हेगारी नऊ टक्‍क्‍यांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापुरातील गुन्हेगारी
शहरात दरवर्षी गुन्हेगारी नऊ टक्‍क्‍यांची वाढ

सोलापूर : शहरात दरवर्षी गुन्हेगारी नऊ टक्‍क्‍यांची वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहराचा विस्तार, लोकसंख्येत वाढ झाल्याने दरवर्षी गुन्हेगारीत नऊ टक्‍क्‍यांची वाढ होत आहे. शहरातील विजापूर नाका, एमआयडीसी व फौजदार चावडी पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. गुन्हेगारी रोखता यावी म्हणून शहरात सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्याची गरज गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्‍त केली. मात्र, दीड वर्षांपूर्वी पोलिस आयुक्‍तालयाने महापालिकेला २५० सीसीटीव्हीचा प्रस्ताव देऊनही त्यावर अजूनपर्यंत काहीच कार्यवाही झालेली नाही.

त्यामुळे अनेक गुन्ह्यातील गुन्हेगार मोकाट असल्याचे चित्र आहे. नोकरी, शिक्षण अथवा अन्य कामांसाठी परगावी गेलेल्यांच्या घरावर चोरट्यांनी वॉच ठेवून चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे नागरिकांना घरात मौल्यवान वस्तू अथवा मोठी रक्‍कम ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच घरासमोर दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्याही सूचना केल्या. परंतु, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दुसरीकडे चेन स्नॅचिंगचे गुन्हेही वाढत असून अनेकदा सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या गुन्हेगारांना शोधताना पोलिसांना कठीण जाते. या पार्श्‍वभूमीवर मुख्य चौकांसह वर्दळीच्या ठिकाणी अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असा प्रस्ताव पोलिस आयुक्‍तालयाने महापालिकेला दीड वर्षांपूर्वी दिला. स्मार्ट सिटीतून पाच कोटींचे कॅमेरे बसविले जातील, असे आश्‍वासन पोलिसांना मिळाले. मात्र, दीड वर्षांनंतरही शहरात कुठेही स्मार्ट सिटीकडून सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला नाही.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

‘सलगर वस्ती’ला नाही डीबी पथक
शहरातील सात पोलिस ठाण्यांपैकी जेलरोड, एमआयडीसी, फौजदार चावडी, विजापूर नाका, जोडभावी पेठ आणि सदर बझार या पोलिस ठाण्यांकडे गुन्हेगारांच्या शोधासाठी डीबी पथक कार्यरत आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी सलगर वस्ती पोलिस ठाण्याकडे अद्याप डीबी पथक निर्माण झालेले नाही. दुसरीकडे काही पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी रजा, सुट्ट्यांवर गेल्यानंतर अतिरिक्‍त मनुष्यबळाअभावी संबंधित कर्मचारी सुट्टीवरुन येईपर्यंत गुन्ह्यांचा तपास जागेवरच थांबलेला असतो, अशी चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर अन्यायग्रस्तांना वेळेत न्याय मिळावा म्हणून नूतन पोलिस आयुक्‍त हरीश बैजल काय ठोस उपाययोजना करतील, याचीही उत्सुकता आहे.
दुचाकी व मोबाइल चोरी सर्वाधिक
दरवर्षी डिसेंबर महिन्यात गुन्हेगारीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन चोरट्यांचा कल, त्यांची चोरीची पध्दत, चोरटे कोणत्या भागातून येतात, कशाप्रकारे बाहेर पडतात, याचा अहवाल तयार केला जातो. शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून त्यात दुचाकी व मोबाईल चोरी सर्वाधिक आहे. तरीही, कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर चोरटे घरातील हाती लागेल त्या वस्तूवर डल्ला मारत असल्याचे चित्र आहे. चोरी कमी व्हावी, गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून आता रात्रीची गस्त वाढवून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यादृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्यात हलगर्जीपणा चालणार नाही, अशी ताकीदही देण्यात आली आहे.
- हरीश बैजल, पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर

loading image
go to top